बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल
(आनंद कांबळे ) जुन्नर : शिरूर लोकसभा मतदार संघात प्रचाराचा नारळ फुटला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार खा. डॉ. अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या दोन्ही विरोधी नेत्यांची किल्ले शिवनेरीवर भेट झाली. या भेटी दरम्यानच्या एका प्रसंगाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.आज तिथिनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे. यानिमित्त डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवनेरी किल्ल्यावर आले होते, शिवनेरीच्या पायरीवर नतमस्तक होऊन दोघांकडून प्रचार सुरू करण्यात आला. त्यावेळी दोघांची समोरा समोर भेट झाली. यावेळी खा.अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे चरण स्पर्श करत आशिर्वाद घेतला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून याची चर्चा होत आहे.माध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, वयस्कर व्यक्तीला वाकून नमस्कार करणे ही संस्कृती आहे, समोर वयस्कर व्यक्ती आली मग ती निवडणूकीच्या रंगणात आहे किंवा इतर ठिकाणी. राजकारणातील सुसंकृतता प्रत्येकाने जपली पाहिजे. असेही कोल्हे म्हणाले. तर आढळराव पाटील म्हणाले की, आता हे ठिक आहे, हि प्रथा आहे हिंदु धर्मामध्ये जेष्ठाच्या पायाला स्पर्श करण्याचा. त्यांनी मला शुभेच्या दिल्या मी त्यांना शुभेच्छा दिल्या, असे ते म्हणाले.