पराळे येथे वीज तारांमुळे गवताच्या हेलाला आग; शेतकऱ्याचे सुमारे १.९५ लाखांचे नुकसान.

Share This News

बातमी 24तास

राजगुरुनगर प्रतिनिधी: (गणेश आहेरकर )पराळे (ता. खेड) येथे महावितरणच्या लाईटच्या तारांना स्पार्क होऊन लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. येथील शेतकरी सुनील बबन कलवडे यांच्या गवताच्या हेलाला अचानक आग लागली. या आगीत अंदाजे ३ हजार पेंढ्या जळून खाक झाल्या असून ट्रॉली अर्धवट जळाली आहे.या दुर्घटनेत सुमारे ४५ हजार रुपयांचे गवत आणि १ लाख ५० हजार रुपयांची ट्रॉली असे एकूण १ लाख ९५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.सदर नुकसान हे महावितरण विभागाने रस्त्यामधून पोल व तारा नेल्यामुळे झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या घटनेचा पंचनामा करून सर्व नुकसानभरपाई महावितरण विभागाने द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच महावितरणने तत्काळ मेंटेनन्सचे काम करावे आणि रस्त्यामधील धोकादायक पोल व तारा त्वरित हटवाव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.या घटनेनंतर खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयसिंग दरेकर यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानग्रस्त शेतकऱ्याला महावितरण विभागाने तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे वारंवार नुकसान होत असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy