
बातमी24तास
*”अजितदादा”* हा त्यांचा पत्ता. हे एक अक्षर त्यांचे कर्तृत्व. हा एक शब्द म्हणजेच गती… म्हणजेच कामाचा सपाटा, कामाचा उरक… ऊर्जा… धाडस… स्पष्ट… निर्भीड…अशी सारी विशेषणे याच नावाला चपखल शोभायची. अलीकडच्या अळणी, साजूक तुपातल्या मिळमिळीत राजकारणात अजितदादा हे काटा किर्र झणझणीत तिखट नेतृत्व! इतकेच नाही तर राजकीय वादळातही अजेय, अजीत असं धगधगते नेतृत्व. रांगडेपणा ज्यांचा स्थायीभाव. कडक शिस्त आणि वक्तशीरपणा हा त्यांच्या राजकारणाचा पाया. बिनधास्त बोलण्यातील मिश्किली आणि विनोदी भाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलूंपैकी एक पैलू. हे सारे वर्णन करण्यापेक्षा एका वाक्यात सांगायचे झाल्यास “अजितदादा, बस नाम ही काफी है”, असे सांगावे लागेल.
अजित दादा हे फक्त नाव नसून एक पर्व असे म्हणावे लागेल. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, लोकनेते शरद पवार ही जर राजकारणाची विद्यापीठे असतील तर अजितदादा हे एक सर्व अभ्यासक्रमांची सोय असलेले ख्यातनाम आणि लौकिकपात्र महाविद्यालय म्हणावे लागेल. त्यांनी विकासात्मक राजकारणाची जी पेरणी महाराष्ट्रात केली त्याला तोड नाही. किंबहुना प्रचलित नेत्यांमध्ये त्यांची बरोबरी करण्याची व्यापक अर्थाने लायकी नाही, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अजित दादाला विरोधकही जो आदर द्यायचे तो त्यांनी त्यांच्या राजकीय कर्तृत्वातून कमावलेला होता. काकांच्या वटवृक्षाखाली स्वतःला मोठे करताना म्हणजेच वेगळी ओळख निर्माण करून महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी जो ठसा उमटवला त्याला तोड नाही. कार्यकर्त्यांना दमात घेणे आणि त्याच प्रमाणे जीव लावणे आणि तळागळात दांडगा संपर्क ठेवणे हे अलीकडच्या मोठ्या नेत्यांमध्ये अभावाने आढळते. अजितदादा मात्र यास अपवाद होते. ग्रामीण भाषेतील त्यांचे शब्द कार्यकर्त्यांना आपलेसे करून गेली. मोकळे ढाकळे बोलण्यातून काही ग्रामीण शैलीतील वाक्ये अनावधानाने त्यांच्या तोंडातून निघाली. ती सल कायम त्यांच्या मनात राहिली. वेळोवेळी त्यांच्या बोलण्यातून ते जाणवत राहिले. मीडियाने त्यांना त्यावेळी शाब्दिक फटके दिले खरे! वास्तविक अशा बिनधास्त नेत्याला एवढा क्लेश देणे तसे अनुचित होते…. यश आणि पराभव त्याच संयत आणि संयमाने पचवणारा अजित पवार हा नेता वेगळाच म्हणावा लागेल. विकासकामांच्या बाबतीत आपला आणि विरोधक असा भेदभाव न ठेवणारा हा माणूस रांगडा असाच होता. एकूणच त्यांचे राजकीय निर्णय, कामाची पद्धत, सर्वसामान्यांची कामे करताना त्यांची भूमिका, साध्यातल्या साध्या माणसाशी त्यांचे वागणे वगैरे सारे पाहिले तर हा माणूस फणसासारखा होता असे म्हणावे लागेल. बाहेरून काटेरी असलेला दादा आतून मऊ होता असे बहुतांश मंडळी सांगतात. आतून कित्येकदा कोलमडलेला दादा कधी जनतेला दिसला नाही. कोंडमारा आतल्या आत ठेवणारा दादा खऱ्या अर्थाने यशस्वी नेता होता. आयुष्यभरात घवघवीत यश पदरी पडल्यानंतरही हा जमिनीवर राहिलेला नेता सर्वांचा दादा होता. तो राजकारणातला खरा मर्द गडी होता. अलीकडे जे दांभिक राजकारण सुरू आहे त्या राजकारणाला खऱ्या अर्थाने सुरंग लावण्याची ताकद अजित दादा या खमक्या मर्दात होती…. …… पण…… नियती क्रूर वागली
!दादा तुमच्यासाठी माझी काही शब्द फुले…..