
बातमी 24तास,चाकण प्रतिनिधी : प्रभाग क्र. ९ च्या विद्यमान नगरसेविका सौ. अनिताताई श्रीराम घोगरे यांनी चाकण नगरपरिषदेच्या येणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये आपल्या प्रभागातील तब्बल २० महत्त्वपूर्ण विकासकामांची सविस्तर यादी मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्षा मनीषाताई गोरे यांच्याकडे अधिकृतरित्या सादर केली आहे.
प्रभागातील नागरिकांना मूलभूत व अत्यावश्यक नागरी सुविधा सक्षमपणे उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने पहिल्या टप्प्यात ही सर्व कामे हाती घेण्यात येणार आहेत. रस्ते विकास, पाणीपुरवठा, गटार व्यवस्था, स्वच्छता, वीज व अन्य नागरी सुविधांशी संबंधित कामांचा या यादीत समावेश असून, प्रभागाचा सर्वांगीण व संतुलित विकास साधण्याचा निर्धार नगरसेविका सौ. अनिताताई घोगरे यांनी यावेळी व्यक्त केला.
लोकप्रतिनिधी म्हणून मिळालेल्या विश्वासाला सार्थ ठरवत, येणाऱ्या काळात ही सर्व कामे वेळेत, गुणवत्तापूर्ण व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या ठोस व विकासाभिमुख भूमिकेमुळे प्रभाग क्र. ९ च्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.