
बातमी 24तास
चाकण (योगेश गायकवाड) येथील नवयुग मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त व भरघोस प्रतिसाद लाभला. गेल्या १८ वर्षांपासून सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करून मंडळ समाजात “रक्तदान हे श्रेष्ठ दान” हा संदेश देत आहे. रक्तदानातून एखाद्या गरजू रुग्णाचा जीव वाचू शकतो, ही सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मंडळाकडून केले जात आहे.
या रक्तदान शिबिरामध्ये तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. रक्तदानाबाबत वाढती जागरूकता आणि सामाजिक बांधिलकीमुळे शिबिर यशस्वी ठरले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित पद्धतीने रक्तसंकलन करण्यात आले.नवयुग मित्र मंडळाच्या सामाजिक कार्याची दखल घेत पुणे पिंपरी चिंचवड ब्लड बँकेच्या वतीने सन्मानचिन्ह प्रदान करून मंडळाचा सत्कार करण्यात आला.
गेली अनेक वर्षे अखंडपणे राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाबद्दल ब्लड बँकेच्या अधिकाऱ्यांनी मंडळाचे विशेष कौतुक केले.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नवयुग मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदात्यांसाठी आवश्यक वैद्यकीय तपासणी, अल्पोपहार तसेच प्रमाणपत्रांची योग्य व्यवस्था करण्यात आली होती.१८ वर्षांची परंपरा जपत सातत्याने राबवले जाणारे हे रक्तदान शिबिर समाजातील गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरत असून, सामाजिक एकोपा, सेवाभाव आणि माणुसकीचे दर्शन घडवणारा उपक्रम ठरला आहे.