
बातमी 24तास
चाकण ( कल्पेश अ. भोई ) चाकण नगरपरिषद निवडणूक २०२५ नुकतीच पार पडली असून, या निवडणुकीत बहुतांश प्रभागांत पक्षीय उमेदवार निवडून आले आहेत. मात्र वार्ड क्रमांक ९ मधून निवडून आलेले अपक्ष नगरसेवक श्री. मंगेश शिवाजी कांडगे हे खऱ्या अर्थाने जनतेच्या जोरावर विजयी झालेले एकमेव नगरसेवक असल्याची भावना वार्डमधील नागरिकांनी व्यक्त केली आहे.वार्ड क्रमांक ९ मधील नागरिकांच्या मते, श्री. मंगेश कांडगे यांनी कोणत्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर न घेता, आपल्या मित्रपरिवाराच्या, विविध मित्र मंडळांच्या तसेच वार्डातील गोरगरीब जनतेच्या पाठबळावर निवडणूक लढवली आणि यश संपादन केले.
नवयुग मित्र मंडळ, त्रिमूर्ती मित्र मंडळ,मयूर मित्र मंडळ, छत्रपती नगर मित्र मंडळ, खंडोबा मित्र मंडळ व इतर सामाजिक संघटनांना सोबत घेऊन तसेच गावचे ग्रामदैवत श्री. खंडोबा देवस्थानच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्यातूनच त्यांना जनतेचा भरभरून पाठिंबा मिळाल्याचे नागरिकांचे मत आहे.
नागरिकांनी आपल्या निवेदनात दिवंगत आमदार स्व. सुरेशभाऊ नामदेव गोरे यांच्या विचारांचा उल्लेख करत, त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा खऱ्या अर्थाने या निवडणुकीत प्रत्यक्षात उतरवण्याचे काम श्री. मंगेश कांडगे यांनीच केल्याचे नमूद केले आहे. स्व. आमदार गोरे यांच्याविरोधात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला असतानाही, त्यांनी आपल्या बुद्धीचातुर्याने आणि सहकार्याच्या बळावर यश मिळवले होते. त्याच धर्तीवर श्री. कांडगे यांनीही पक्षीय राजकारणाला बाजूला ठेवून जनतेच्या विश्वासावर विजय मिळवल्याचे नागरिक सांगतात.यामुळे “चाकण नगरपरिषदेत खऱ्या अर्थाने जनतेतून निवडून आलेले एकमेव नगरसेवक श्री. मंगेश शिवाजी कांडगे आहेत,” अशी ठाम भूमिका वार्ड क्रमांक ९ मधील नागरिकांनी मांडली आहे.दरम्यान, स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या विचारांना खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल, तर सुशिक्षित, समाजसेवेची जाण आणि अनुभव असलेले नवे नेतृत्व म्हणून श्री. मंगेश शिवाजी कांडगे यांची उपनगराध्यक्षपदी निवड करावी, अशी कळकळीची मागणी वार्डातील नागरिकांनी केली आहे.पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एक आगळावेगळा आणि सकारात्मक निर्णय घ्यावा व उपनगराध्यक्षपदाची माळ अपक्ष नगरसेवक श्री. मंगेश शिवाजी कांडगे यांच्या गळ्यात घालावी, अशी विनंती वार्ड क्रमांक ९ मधील नागरिकांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व सर्व पक्षश्रेष्ठींना करणार आहेत.