
बातमी 24तास
चाकण, ( वृत्त सेवा ) स्वच्छतेचे प्रणेते राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या ६९ व्या पुण्यतिथीनिमित्त चाकण एसटी स्टँड परिसरात खेड तालुका परीट समाजाच्या वतीने भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमातून गाडगेबाबांच्या स्वच्छता आणि सामाजिक जागृतीच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन करण्यात आले.

या वेळी राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन आगार प्रमुख संदीप गावडे, नाणेकरवाडी ग्रामपंचायतीचे मुकादम अमोल निकाळे, चाकण नगरपरिषदेचे मुकादम विजय भोसले तसेच समाजबांधव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विधिवत स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली.या मोहिमेदरम्यान चाकण एसटी स्टँड व परिसरातील कचरा, घाण साफ करून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.
नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” या भक्तिमय भजनांनी करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत खेड तालुका परीट समाजातील सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाणेकरवाडी व चाकण नगरपरिषदेचे सफाई कामगार तसेच समाजातील सर्व समाजबांधव यांनी विशेष परिश्रम घेतले. या मोहिमेमुळे गाडगेबाबांच्या स्वच्छता संदेशाला नवी ऊर्जा मिळाली असून परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.