
बातमी 24तास,चाकण (अतिश मेटे): चाकण येथील श्री. झित्राईमाता महिला भजनी मंडळ, झित्राईमळा यांना पंढरपूर येथे श्री विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात भजन सेवा करण्याचा मान मिळाल्याने चाकण परिसरातून आनंद व अभिमान व्यक्त केला जात आहे.
पंढरपूरच्या दरबारात महिला मंडळाच्या भक्तिपूर्ण गायनाला विशेष संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंडळाच्या वतीने श्री विठ्ठल–रूख्मिणी मंदिर देवस्थान ट्रस्टचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.दरवर्षी विविध कीर्तनकार, भजनी मंडळांना विठुरायाच्या चरणी “भजन सेवा” करण्यासाठी निमंत्रित करण्यात येते. त्या परंपरेत यंदा झित्राईमळ्यातील या महिला भजनी मंडळाची निवड झाली. मंडळातील महिला भगिनींनी पारंपरिक ताल–मृदंगाच्या साथीने हरिनाम सप्ताह, गोकुळाष्टमी, प्रबोधिनी एकादशी, तसेच स्थानिक धार्मिक कार्यक्रमांत भजनसेवेची उज्ज्वल परंपरा पुढे नेली आहे.या सन्मानामुळे मंडळातील सर्व सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, “विठुरायाच्या चरणी भजन सेवा करण्याची संधी म्हणजे आयुष्यातील अविस्मरणीय क्षण”, अशी भावना मंडळातील सदस्य महिलांनी व्यक्त केली.भविष्यातही अशाच भक्तिमय सेवेसाठी मंडळ सतत कार्यरत राहील, असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.