
बातमी 24तास,चाकण (अतिश मेटे): चाकण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठी बाजी मारत दोन जागा बिनविरोध जिंकल्या आहेत.
प्रभाग क्र. 10 (ब) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश भुजबळ यांच्या विरोधात असलेले भाजप उमेदवार गणेश नाईक यांनी माघार घेतली, तर प्रभाग क्र. 7 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा सुयोग शेवकरी यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार पल्लवी निलेश टिळेकर यांनी माघार जाहीर केली.

दोन्ही प्रभागांत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चित झाला आहे.माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या राजकीय घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा आनंदोत्सव साजरा झाला. उमेदवारांच्या माघारीमुळे प्रभागात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे.बिनविरोध विजयानंतर चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राम गोरे, निलेश जेधे, सुयोग शेवकरी, मोबीन काझी, सचिन पानसरे, विजया तोडकर, सचिन परदेशी यांसह सर्व उमेदवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ढोल-ताशांच्या गजरात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत विजयाचा आनंद व्यक्त केला.पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मते, हा बिनविरोध विजय आगामी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक दृढ करणारा ठरणार आहे. प्रभागातील नागरिकांनी दाखवलेल्या पाठिंब्यामुळे पक्षाच्या विजयाचा आत्मविश्वास अधिक मजबूत झाल्याचे प्रतिक्रियांतून दिसून येत आहे.