
बातमी 24तास
चाकण (प्रतिनिधी)चाकण परिसरातील रहिवाशांची नव्या वर्षाची सुरुवात अत्यंत दुःखद ठरली आहे. दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी (रविवार) चाकण शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तब्बल ३५ लहान-मोठ्या नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे अनेक कुटुंबांना नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच नाहक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे.
या प्रकारास चाकण नगरपरिषदेच्या गलथान व निष्काळजी कारभारालाच जबाबदार धरत भारतीय जनता पार्टी, चाकण मंडलच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले. कुत्रा चाव्यामुळे जखमी झालेल्या सर्व नागरिकांच्या उपचारांचा संपूर्ण खर्च हा संबंधित ठेकेदार व नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.भाजप पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, जर सदर मागण्या तातडीने पूर्ण करण्यात आल्या नाहीत, तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात रस्त्यावर उतरून आवाज उठवावा लागेल, असेही त्यांनी नमूद केले.या वेळी भाजप चाकण मंडल अध्यक्ष भगवान मेदनकर, सरचिटणीस अजय जगनाडे, संदेश जाधव, प्रदेश उपाध्यक्ष शाम पुसदकर, प्रितम शिंदे, दत्ता परदेशी, योगेश देशमुख, गणपती गौडा पाटील, मंगेश देसाई, नसीम पठाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान, शहरात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे नगरपरिषद वारंवार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस व प्रभावी उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.