
बातमी 24तास
चाकण (प्रतिनिधी)खेड तालुक्यातील आंबेठाण येथील अंगारमळा परिसरात मागील दोन दिवसांत बिबट्याने धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. रात्रीच्या वेळी बिबट्याने ललित पडवळ व शिवाजी घाटे यांच्या कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्यात आला असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.दरम्यान, नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी, एकटे बाहेर पडू नये, लहान मुले व पाळीव प्राणी यांच्यावर लक्ष ठेवावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे. बिबट्याच्या हालचाली आढळल्यास त्वरित वनविभाग किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.अशी माहिती अंगारमळा येथील रहिवासी अभिमन्यु शेलार यांनी दिली.