चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

Share This News

बेकायदा गावठी हातभट्टी उद्ध्वस्त; ४,००० लिटर रसायन नष्ट, १.४० लाखांचा मुद्देमाल

बातमी 24तास

चाकण (वृत्त सेवा) अवैध दारू निर्मिती व विक्री विरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने कडक पावले उचलत चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत मोठी धडक कारवाई केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा पिंपरी-चिंचवड यांनी केलेल्या या कारवाईत बेकायदा विना परवाना चालवण्यात येणारी गावठी हातभट्टी उघडकीस आणून दारू तयार करण्यासाठी साठवलेले सुमारे ४,००० लिटर रसायन नष्ट करण्यात आले. या रसायनांची अंदाजे किंमत १ लाख ४० हजार रुपये इतकी आहे.

आज दिनांक ०७ जानेवारी २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस हवालदार निखिल शेटे (१७०६), विजय दौंडकर (१९१६), पोलीस अंमलदार निखिल वर्पे (२३८१) व संतोष सपकाळ हे चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस अंमलदार निखिल वर्पे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तात्काळ कारवाईचे नियोजन करण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार मौजे रासे, ता. खेड, जि. पुणे येथील डोंगराच्या कडेला, निर्जन परिसरात झाडाझुडपांच्या आड बेकायदा गावठी हातभट्टीसाठी रसायन साठवण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता अर्जुन बिरबल राठोड (रा. रासे, ता. खेड, जि. पुणे) याने कोणताही परवाना नसताना गावठी दारू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रसायन साठवून ठेवल्याचे आढळून आले.पोलीस पथकाने पंचनामा करून सदर रसायन जागेवरच नष्ट केले. या प्रकरणी संबंधित इसमाविरुद्ध चाकण उत्तर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (क)(फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून या मागे कोणते जाळे कार्यरत आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

सदर कारवाई विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड, शशिकांत महावरकर, सह पोलीस आयुक्त, सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त, शिवाजी पवार, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) व प्रवीण मोरे, सहा. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड व त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

अवैध गावठी दारूमुळे सामाजिक आरोग्य व कायदा-सुव्यवस्थेवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, अशा प्रकारच्या बेकायदा व्यवसायाविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनीही अशा गैरप्रकारांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy