

बातमी 24तास
चाकण (प्रतिनिधी, अतिश मेटे) : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकण शहरात भव्य रूट मार्च काढण्यात आला. पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचा दृढ संदेश देत नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली.या रूट मार्चमध्ये परिमंडळ-३ चे पोलीस उपआयुक्त बापू बांगर, चाकण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, चाकण पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्यासह ३० अधिकारी व २५० पोलीस अंमलदार, एक SRPF प्लॅटून आणि एक दंगल नियंत्रण पथक सहभागी झाले होते.
पोलीस निरीक्षक संजय सोळंके म्हणाले, “गणेशोत्सव, नवरात्र किंवा कोणताही सामाजिक कार्यक्रम असो, पोलीस प्रशासन नेहमीच नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असते. कायदा-सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणे ही आमची जबाबदारी आहे.”गणेशोत्सव काळात वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन, महिलांची सुरक्षा, मुलांचे संरक्षण आणि आपत्कालीन सेवांशी समन्वय यासाठी पोलिसांची विशेष योजना आखण्यात आली आहे.तसेच, नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी रूट मार्च, पथसंचलन आणि गस्तीदलांच्या माध्यमातून पोलिसांची सतत उपस्थिती जाणवेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. नागरिकांनी उत्सव काळात पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, कायद्याचे पालन करावे आणि शांततेत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


