
बातमी 24तास
चाकण ( प्रतिनिधी, अतिश मेटे ) : चाकण शिक्षण मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय व अभिमन्यू शेलार मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “योद्धा शेतकरी युगात्मा शरद जोशी वैचारिक व्याख्यानमाला” यंदा आपल्या १३व्या वर्षात पदार्पण करत आहे. ही व्याख्यानमाला सोमवार, १ सप्टेंबर ते बुधवार, ३ सप्टेंबर २०२५ या कालावधीत सकाळी ९.३० वा. महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे.
पहिल्या पुष्पात साधना साप्ताहिक, पुणेचे संपादक विनोद शिरसाठ हे “नवीन शैक्षणिक धोरण : एका संपादकाच्या नजरेतून” या विषयावर मार्गदर्शन करतील. दुसऱ्या पुष्पात लेखक-गीतकार व दिग्दर्शक अरविंद जगताप “गोष्ट छोटी डोंगराएवढी” हा विषय हाताळतील. तिसऱ्या पुष्पात माजी अध्यक्ष, शेतकरी संघटना, जालना येथील लक्ष्मण वडले “शासकीय धोरणे व शेतकऱ्यांच्या आत्महत्या” या ज्वलंत विषयावर विचार मांडणार आहेत.या व्याख्यानमालेस मार्गदर्शक व विश्वस्त म्हणून डॉ. दीपक म्हैसेकर (मा. सनदी अधिकारी), विश्वस्त अतुलचंद्र कुलकर्णी ( मा.आयपीएस अधिकारी ), डॉ. अविनाश अरगडे ( विश्वस्त सचिव ), मोतीलाल सांकला ( कार्यकारी विश्वस्त ), तसेच अभिमन्यू शेलार (प्रायोजक व चेअरमन महाशिवार अँग्रो ) यांचे विशेष योगदान आहे.कार्यक्रमाचे समन्वयक, विश्वस्त मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तसेच आजी-माजी विद्यार्थी व चाकणकर ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून विचारांची गंगा अनुभवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. शेतकरी चळवळीचे प्रणेते युगात्मा शरद जोशी यांच्या विचारांवर आधारित ही व्याख्यानमाला समाजातील शैक्षणिक, सामाजिक व शेतकरी प्रश्नांवर चिंतन करण्याची महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे.


