
बातमी 24तास
चाकण (प्रतिनिधी, अतिश मेटे) : मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विरोधी पक्षाने आपली ठोस भूमिका तातडीने स्पष्ट करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक मनोहर वाडेकर यांनी केली. चाकण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करताना वाडेकर म्हणाले, “आजपर्यंत सत्ताधारी पक्षासोबतच विरोधकांनीही मराठा आरक्षणाबाबत कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. जनतेसमोर फक्त आश्वासने दिली जात आहेत. मात्र, या वेळेस समाज फसवला जाणार नाही. आम्ही जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी गनिमी कावा पद्धतीने उपस्थित राहून लढा देऊ. आगामी काही दिवसांत सरकारला आरक्षणाचा निर्णय घ्यावाच लागेल, असा आमचा निर्धार आहे.”या पत्रकार परिषदेस भगवान मेदनकर, कुशल जाधव, अविनाश टोपे, दीपक टोपे आदी मान्यवर उपस्थित होते.
वाडेकर पुढे म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांच्या मागील आंदोलनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने मराठा समाजाला आश्वासने दिली होती. परंतु त्याची पूर्तता झाली नाही. समाजाची दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे आता आम्ही आरक्षण मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. आमच्या मागण्यांबाबत सरकारने खेळ केले तर त्याला तीव्र आंदोलनाचा सामना करावा लागेल.”गेल्या तीन-चार वर्षांपासून मनोज जरांगे पाटील सातत्याने मराठा आरक्षणासाठी झगडत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने अनेकदा मोठ्या आंदोलनांत सहभाग नोंदवला आहे. ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची हमी मिळावी, हीच मराठा समाजाची प्रमुख व एकमुखी मागणी आहे.मराठा आरक्षणासाठी सुरू झालेला हा लढा आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून येत्या काही दिवसांत सरकारसमोर कठीण प्रश्न उभा राहणार आहे.


