
बातमी 24तास ( चाकण प्रतिनिधी, अतिश मेटे ) :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बाजारपेठ उत्साहाने सजली आहे. बाप्पाच्या आगमनासाठी चाकरमान्यांची गावाकडे परतीची लगबग सुरू झाली असून सर्वत्र आनंद, उत्साह आणि भक्तीचे वातावरण आहे.चाकणसह परिसरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गणेशमूर्ती, सजावटीची साहित्ये, हार, तोरणे, लाईट्स, रंगीबेरंगी फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. छोट्या ते मोठ्या अशा सर्व आकारातील गणेशमूर्ती विक्रीसाठी मांडल्या गेल्या असून भक्त वर्गामध्ये आकर्षक मूर्ती घेण्यासाठी स्पर्धा दिसून येत आहे.

पर्यावरणपूरक मूर्तींसाठीही विशेष मागणी असून मातीच्या मूर्तींचे वेगळे स्टॉल्स लावण्यात आले आहेत.फुलबाजारात जाई-जुई, झेंडू, मोगऱ्याच्या माळांची रेलचेल आहे. याशिवाय रंगीबेरंगी सजावटीच्या कागदांचा, बल्बच्या साखळ्यांचा आणि आधुनिक सजावटीच्या साहित्यांचा बाजार तेजीत आहे. मिठाईच्या दुकानांमध्येही ग्राहकांची वर्दळ वाढली असून मोदक, लाडू, पेढे, बर्फी आदी पदार्थांची खरेदी सुरू झाली आहे.पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी गर्दी नियंत्रण व सुरक्षेच्या दृष्टीने विशेष नियोजन केले असून बाजारपेठेत स्वच्छता व सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणेशभक्त मात्र आपल्या बाप्पाच्या स्वागतासाठी उत्साहाने तयारी करत असल्याचे दिसून येत आहे.
जाहिरात 👇👇

