चाकण (प्रतिनिधी, अतिश मेटे ) : चाकण परिसरासह पुणे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहर व ग्रामीण भागात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.वाहतूक ठप्प झाल्याने कामावर जाणारे कर्मचारी, शाळकरी मुले तसेच तातडीच्या कारणांसाठी प्रवास करणारे लोक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. रस्त्यांवर खड्डे पडल्याने पावसाचे पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. त्यामुळे अनेक वाहनं या खड्ड्यांत अडकत असून दुरुस्तीसाठी वाहनधारकांना घाम गाळावा लागत आहे.दरम्यान, मुसळधार पावसाचा परिणाम थेट शेती आणि बाजारपेठांवरही दिसून येत आहे. शेतमाल बाजारात पोहोचण्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे भाजीपाला आणि फळांच्या आवक कमी झाली आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांना सहन करावा लागत असून बाजारभाव घसरले आहेत. काही ठिकाणी शेतमाल खराब झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पावसामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. पाणी साचलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे वाहतूक, बाजारपेठ आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे.