चाकण, (प्रतिनिधी अतिश मेटे ) : गेल्या ३ ते ४ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भामा आसखेड धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मंगळवार दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ६ वाजता धरणाचा जलस्तर ६७०.४१ मीटर इतका नोंदवला गेला असून, एकूण साठा २१४.२३४ दशलक्ष घनमीटर (७.५६ टीएमसी) इतका झाला आहे. सध्या धरण ९२.४४ टक्के भरले असून, उपयुक्त साठा २००.७१२ दशलक्ष घनमीटर (७.०९ टीएमसी) एवढा आहे.दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी थोडासा कमी साठा असून, गतवर्षी याच दिवशी धरण जवळपास ९९.६५ टक्के भरले होते. तरीदेखील गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे पाणीटंचाईची भीती काही प्रमाणात दूर झाली आहे. धरण परिसरात आतापर्यंत ७४५ मि.मी. पाऊस झाला असून, फक्त गेल्या २४ तासांत ७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.सध्या धरणातून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. परंतु पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढील काही दिवसांत दरवाजे उघडण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.