
बातमी 24तास
चाकण (प्रतिनिधी, अतिश मेटे) चाकण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटच्या बाहेर रोज सकाळ मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. फळ विक्रेते व शेतीमाल विकणारे व्यावसायिक यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून विक्री सुरू ठेवल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.या कोंडीमुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बस रांगेत अडकतात. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास उशीर होऊन विद्याथ्यांचे नुकसान होत आहे. गर्दीच्या वेळी वादविवाद, भांडणे, तसेच मोबाईल आणि वाहन चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच फळे व शेतीमालाची किरकोळ विक्री सुरू असल्याने खरेदीसाठी आलेले नागरिक आपली वाहने रस्त्यावर उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी अधिक तीव्र होते. अतिक्रमण करणाऱ्या फळ विक्रेत्यांवर आणि रस्त्यावर विक्री करणाऱ्या प्रशासनाने कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीने आणि नगरपरिषदेने वाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, तसेच शेतीमाल आणणाऱ्या व्यापारी व नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंग व विक्रीची ठराविक जागा निश्चित करावी, अशी मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाने वेळेवर पावले उचलली नाहीत, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.