
फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या पाठपुराव्याला यश
बातमी 24तास
चाकण, (प्रतिनिधी) चाकण औद्योगिक परिसरामध्ये सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था नसल्यामुळे कामगारांची कामावर जाण्याची खूप मोठ्या प्रमाणावर गैरसोय निर्माण झाली होती ती दूर करण्यासाठी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने मागील काही वर्षापासून ( Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited) पीएमपीएल वाहतूक व्यवस्थेकडे पाठपुरावा केला आहे.
औद्योगिक क्षेत्रात बस सुविधा सुरू व्हावी ही फार काळापासूनची फेडरेशन ऑफ चाकणची इंडस्ट्रीजची प्रलंबित मागणी होती. फेडरेशनने याचा पाठपुरावा जिल्हाधिकारी, पीएमपीएमएलचे एमडी, उद्योग मित्र, इंडस्ट्री मिनिस्टर इत्यादी अनेक ठिकाणी केला होता. त्या पाठपुराव्याला यश येऊन आज चाकण औद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्षात पीएमपीएमएल ची बस सेवा सुरू होत आहे. चाकण एमआयडीसीत वर्तुळाकार बसेसचे आज शनिवार दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी एनटीबी इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीजवळ फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे संचालक कमल कचोलिया यांचे हस्ते उद्घाटन झाले.
या कार्यक्रमास दिलीप बटवाल सीईओ एफसीआय, विनोद जैन, गोविंद पानसरे, एनटीबी चे जीएम ए राजा, सिद्धराम चडचणी, पीएमपीएल चे राजेश जाधव, संपत शेळीमकर जीएम अँटनी, अनिल रासकर, दादा वारे, अण्णा सावंत, श्रीकांत कारले, शरद वाळूज इत्यादी अनेक अधिकारी उपस्थित होते. या बसच्या सर्विस मुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अपघात कमी होतील, कामगारांना आपआपले कारखान्यात जाण्यासाठी मदत होईल शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांना बसची सुविधा उपलब्ध होईल. रस्त्यावर वाहने कमी येतील. हजारो कामगारांना या बसचा फायदा होणार आहे त्याचबरोबर महिला कामगारांसाठी महिला कंडक्टरही या बस मध्ये असणार आहे.
सदर बस प्रत्येक अर्ध्या तासाने रस्त्यावर धावेल. या बसचा मार्ग वर्तुळाकार असणार आहे. सदर बस आंबेठाण चौक चाकण येथून सुटून आळंदी फाटा, निघोजे फाटा, मर्सिडीज चौक, स्कोडा गेट नंबर एक, सिग्मा चौक, एचपी चौक, बजाज कंपनी महाळुंगे,खराबवाडी चाकण आणि आंबेठाण चौक रूट असेल. त्याचबरोबर भोसरी ते निघोजे गाव अशीही बस सुरू करण्यात आली.
या बसचा मार्ग भोसरी, चाकण रोड, मोशी जकात नाका, मोशी गाव, चिंबळी फाटा, कुरळी फाटा, निघोजे फाटा मर्सिडीज चौक, स्कोडा गेट नंबर दोन सिग्मा कंपनी एन्जुरन्स कंपनी महिंद्रा कंपनी गेट नंबर एक,2 निघोजेगाव असा मार्ग असेल.पीएमपीएमएलच्या या सेवेमुळे वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होणार आहे. त्याचबरोबर कामगार वेळेत कामावर पोहोचतील, अपघात कमी होतील, कामगारांना आपापली वाहने घेऊन कंपनीत यावे लागणार नाही, परिसरात वाहतुकीच्या सुरक्षिततेत सुधारणा होईल, प्रदूषण कमी होईल असे अनेक फायदे या बस सुविधेमुळे होणार आहेत.