मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यखंडांचे प्रकाशन

Share This News

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करणार-मुख्यमंत्री

बातमी 24तास( वृत्त सेवा)पुणे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे संघर्षमय जीवन, त्यांचे महान कार्य, अजरामर साहित्य जगासमोर येण्याकरिता त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल, याकरीता निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासित करुन अण्णा भाऊ साठे यांनी दाखविलेल्या मार्गावर राज्य शासन मार्गक्रमण करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यखंड क्रमांक ५, ६ आणि ७ च्या साहित्य प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगर विकास राज्य मंत्री माधुरी मिसाळ, आमदार अमित गोरखे, विजय शिवातारे, सुनील कांबळे, हेमंत रासणे,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणु गोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून क्रांती घडवली, समाजाला तेज, स्फुलिंग दिले. साहित्यातील एक एक व्यक्तीरेखा जिवंत केल्या. यांच्या लिखाणामध्ये करुणा, संवेदना, क्रांती, काव्य आणि एक वैश्विकता पहायला मिळते. अण्णाभाऊचे साहित्य जगातील २२ भाषेत अनुवादित झाले असून त्या-त्या देशात ते प्रसिद्ध आहेत. तसेच देशातील विविध विद्यापीठात त्यांच्या साहित्यांवर संशोधन सुरू आहे. रशिया देशामध्ये त्यांच्याबद्दल असलेला सन्मान, आत्मीयता, त्यांच्या साहित्यावर होणारा अभ्यास बघता अभिमानाने ऊर भरुन येतो, भारत मातेचा आणि मराठी मातेचा या सुपुत्राचे साहित्य खऱ्याअर्थांने वैश्विक झाले आहे. अण्णा भाऊंनी कथा, कादंबरी, लोकनाट्य नाटक, सिनेमा पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास दर्शन अशा प्रकारे साहित्यातील प्रत्येक अंगात बहारदारपणे आणले आहेत. त्यांनी ४९ वर्षाच्या आयुष्यात ४० पेक्षा अधिक कादंबऱ्या आणि विविध प्रकारच्या रचना लिहणारे विलक्षण प्रकारचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या साहित्यावर आज हजारो लोक पीएचडी करीत आहेत. खऱ्या अर्थाने ते एक चालते बोलते विद्यापीठ होते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

संताच्या मांदियाळींनी समाजाच्या विषमतेवर प्रहार करतांना समाजामध्ये सुधारणा करुन एकत्रित करण्याचा प्रयत्न केला, अण्णाभाऊंनी त्याच भावनेने तत्कालीन समाज व्यवस्थेची मांडणी करतांना आंर्तभावना, वेदना, संवेदना दर्शवितांना कुठेही कटुता आणली नाही, साहित्य समाजाला एकत्रित करणारे साहित्य आहे. संपूर्ण समतायुक्त समाज निर्माण करण्याचे कार्य केले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांच्या पोवाडा, गीतामध्ये तरुणाईला स्फुर्ती देण्याचे काम केले. रशियात देशात असतांना वीर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीतून आलेलो आहे, याठिकाणी वीरांना वदंन करण्याकरिता आलेलो आहे, असे त्यांनी सांगितले.

नैराश्य हे तलवारीवर साचलेले धुळीसारखे असते, धुळ झटकली की तलवार पुन्हा धारधार होते, पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नाही तर कामगाराच्या तळहातावर उभी आहे, असे प्रेरक विचार त्यांनी दिले.अण्णाभाऊंच्या संघर्षमय जीवनातून त्यांचे व्यक्तीमत्व मोठे झाले. त्यांच्या लेखणीतून समाजाला दिशा, प्रेरणा, सामान्य माणसाला बळ, वंचिताचा आवाज देण्याचे कार्य केले. त्यांचे हे कार्य समाजासमोर आण्याचे काम सुरू आहे. समाजाची मूलतत्त्वे सांगणारे, संवेदना जीवंत ठेवणारे अशाप्रकारचे अजरामर साहित्य पुढच्या प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे, यादृष्टीने संशोधन झाले पाहिजे.

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाकरिता २५ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, स्मारकाचे आराखडेही तयार झाले आहेत, येत्याकाळात लवकरात स्मारक पूर्ण करण्यात येईल, याकरिता राज्य शासन सहकार्य करेल, असेही श्री. फडणवीस म्हणाले.

अण्णाभाऊची स्मृती चिरंतर जपण्याकरिता राज्य शासन कटीबद्ध-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतींना अभिवादन करुन श्री. शिंदे म्हणाले, अण्णा भाऊ हे साहित्यिक, शाहिर, लढाऊ व्यक्तीमत्व, प्रस्थापित मराठी साहित्य, संस्कृती, परंपरा नाकारणारे पहिले दलित बंडखोर लेखक होते. त्यांचे साहित्य प्रबोधन व परिवर्तनवादी होते. त्यांनी साहित्यातून समाजातील वंचित, दीनदलित, कष्टकरी, स्त्रिया, भटके यांच्या व्यथा आणि वेदना मांडण्याचे काम केले. त्यांच्या कथा कांदबऱ्यांमध्ये कामगारांचा श्रमाचा पुरस्कार, जमीनदारांचा शोषणांचा धिक्कार होता. अण्णाभाऊच्या जयंतीचे औचित्य साधून कथा, लोकनाट्य, नाटक, शाहिरी, प्रवासवर्णनांचा खंड वाचकासमोर येत असून ही मराठी क्षेत्रातील अतिशय महत्वाची घटना आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आणि वारसा शेवटच्या घटकांपर्यत नेण्याचे काम अण्णा भाऊंनी केले. प्रखर बुद्धीवाद, समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व, समाजवादी विचारांच्या वैचारिक साधनेवर त्यांचा साहित्य दृष्टीकोन उभा आहे. त्यांच्या शाहिरीने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला बळ मिळण्यासोबत अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा समाजात निर्माण केली. शेतकरी, पददलित, श्रमिक यांच्या वेदंना हुंकार साहित्यातून मांडला, त्यामुळे अण्णा भाऊंची स्मृती चिरंतर जपण्यासोबतच त्यांची उर्जा समाजाला सतत मिळण्याकरिता राज्य शासन कटीबद्ध आहे, असेही श्री. शिंदे म्हणाले.

कार्यक्रमापूर्वी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यखंड क्र. ५, ६ आणि ७ साहित्याविषयी माहिती दिली. यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे प्रकाशन समितीचे सदस्य डॉ. माधव गादेकर, डॉ. बी.एन. गायकवाड, डॉ. सोमनाथ कदम, डॉ. मिलींद कसबे, शिवा कांबळे, डॉ. प्रमोद गारोडे, डॉ. विजय कुमटेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy