
बातमी24तास
चाकण ( प्रतिनिधी,अतिश मेटे) – शहरामध्ये सध्या सुरू असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल सुरू असून, विशेषतः नगरपरिषद हद्दीतील मुख्य रस्त्यांवरील सुरु केलेल्या P1 आणि P2 पार्किंगमुळे समस्या अधिक गंभीर झाली आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्यामुळे वाहनं रस्त्यावरच उभी केली जात आहेत, आणि त्यावरून नागरिक व वाहतूक पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला आहे.वाहतूक पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी उभ्या असलेल्या गाड्या उचलण्याची कारवाई सुरू असतानाच नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. “ज्या ठिकाणी पार्किंगसाठी जागा नाही, तिथे आम्ही वाहनं कुठे लावायची?” असा सवाल नागरिक विचारत आहेत.या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की, जोपर्यंत स्वतंत्र पार्किंगची सोय उपलब्ध केली जात नाही, तोपर्यंत वाहने उचलण्याची कारवाई तात्काळ थांबवावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीन गोरे, राम गोरे, बापूसाहेब वाघ व नागरिकांकडून देण्यात आला आहे.
वाहनानवर वाहतूक विभागाने आकरलेला दंडामुळे सामान्य नागरिकांना मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. यामुळे वेळेचा अपव्यय तर होतोच आहे, शिवाय मानसिक त्रास देखील वाढला आहे. शहरात पार्किंग व्यवस्थेचा अभाव आणि नियोजनाच्या कमतरतेमुळे चाकणमधील वाहतूक समस्या अधिकच चिघळत चालली आहे.
याबाबत चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांच्याशी झालेल्या चर्चेत नगरपरिषदेने संबंधित वाहतूक खात्याला जोपर्यंत पार्किंगची व्यवस्था होत नाही तोपर्यंत वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचं थांबवावे,असे पत्रद्वारे कळवण्यात आले आहे.