
खेळ पैठणीच्या कार्यक्रमात महिलांच्या गर्दीचा उच्चांक.
बातमी 24तास, पिंपळगाव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच पिंपळगाव – मरकळ जिल्हा परिषद गटातील सर्व पक्षीय आघाडीकडून इच्छुक असलेले उमेदवार खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ फाउंडेशनने पिंपळगाव येथील बाजार समितीच्या आवारात खेळ पैठणीचा ‘मेगा फायनल’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला शिवसेना नेते (ठाकरे गट) माजी मंत्री सचिन आहिर, आमदार बाबाजी काळे, शिंदे शिवसेनेच्या नेत्या मा आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या सौभाग्यवती मनीषाताई गोरे ,शिंदे शिवसेनेचे नेते प्रकाश दादा वाडेकर, धनंजय पठारे आवर्जून उपस्थित होते.

यावेळी 10 हजारहून अधिक महिलांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. आत्तापर्यंतच्या या भागात महिलांच्या उपस्थितीचा हा उच्चांक मानला जात आहे. यावेळी माजी मंत्री सचिन आहिर यांनी सभापती विजयसिंह शिंदे यांच्या सर्वपक्षीय नेत्यांशी असलेल्या संबंधाबद्दल गौरवोद्गार काढले तर आमदार बाबाजी काळे यांनी शिंदे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
सभापती विजयसिंह शिंदे यांनी या कार्यक्रमात बोलताना विकासाच्या मुद्यावर मी निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे सांगितले तर महिला सक्षमीकरण या धोरणावर आगामी काळात मोठ्या प्रमाणात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून खेड तालुक्यात शिंदे यांनी यापूर्वी अनेक सामाजिक कामे केली आहेत. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ते तीव्र इच्छुक आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम यावेळी घेण्यात आले.
दरम्यान बाजार समितीच्या सभापती पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना अनेक भौतिक सुविधा देण्याचा प्रयत्न सभापती शिंदे यांनी केला असल्याने सुधीर मुंगसे यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी पहिल्या क्रमांकाचे स्कुटी हे बक्षिस शेलगाव गावच्या दीपाली संतोष आवटे या महिलेने मिळवले तर दुसऱ्या क्रमांकाचे स्कुटी हे बक्षीस दावडी गावच्या अपेक्षा वैभव पाचारणे महिलेला मिळाले तर तिसऱ्या क्रमांकाचे सोन्याची अंगठी हे बक्षीस भोसे गावच्या वैशाली प्रफुल्ल कुटे या महिलेने पटकावले त्याचबरोबर चौथ्या क्रमांकाचे फ्रीज हे बक्षिस कन्हेरसर गावच्या अर्चना संतोष हजारे या महिलेला मिळाले. तर पाचव्या क्रमांकाचे वाशिंग मशीन हे बक्षिस दावडी गावच्या अश्विनी भानुदास गाडगे या महिलेने मिळवले. वेळी मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी या खेळात पाहायला मिळाली. खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे निवेदक क्रांती मळेगावकर यांनी आत्तापर्यंतच्या अशा कार्यक्रमात सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली असल्याचे सांगितले.