चाकण नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल! इच्छुक उमेदवार सज्ज गल्लीबोळात राजकीय चर्चा तापल्या

Share This News

बातमी 24तास, चाकण ( कल्पेश अ. भोई) चाकण नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरात राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांनी तयारीचा धडाका लावत जनसंपर्क मोहिमा सुरू केल्या आहेत. चहाच्या टपरीपासून बाजारपेठेपर्यंत, गल्लीबोळापासून चौकाचौकात निवडणुकीच्या चर्चांना उधाण आलं आहे.

पक्षांतर्गत हालचालींना वेगशहरातील प्रमुख पक्ष :- शिवसेना (दोन्ही गट), भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांनी उमेदवार निवडीसाठी हालचालींना वेग दिला आहे. प्रत्येक गटात इच्छुकांची चढाओढ सुरू असून, नवे चेहरे आणि स्थानिक प्रभावी नेते या निवडणुकीत झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

“यावेळी विकासाचं नेतृत्व तरुणांच्या हातात हवं,” असं म्हणत तरुण कार्यकर्त्यांनी प्रचारयंत्रणा सज्ज केली आहे. काहींनी सोशल मीडियावरून प्रचार मोहिमा सुरू केल्या असून मतदारांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.जनतेच्या प्रश्नांवर भरशहरातील पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, स्वच्छता आणि औद्योगिक विकासामुळे निर्माण झालेल्या अडचणी या निवडणुकीतील प्रमुख मुद्दे ठरण्याची शक्यता आहे.

जनतेच्या प्रश्नांवरच आमचं लक्ष आहे, सत्तेसाठी नव्हे तर बदलासाठी ही लढत असेल, असं काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्याने सांगितलं.तर भाजपच्या गोटातून, “गेल्या काही वर्षांत झालेल्या विकासकामांमुळे जनता आमच्यावर विश्वास ठेवेल,” असा दावा करण्यात आला.

सोशल मीडियावर प्रचाराचा जोर

दरम्यान, सोशल मीडियावरही निवडणुकीचा रंग चढला आहे. विविध पक्षांचे समर्थक बॅनर, पोस्टर, व्हिडिओ आणि घोषवाक्यांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.“लोकांच्या मनात जागा निर्माण करायची असेल, तर आता मैदानात उतरायची वेळ आली आहे,” असं एका तरुण इच्छुकाचं म्हणणं आहे.

नगरपरिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार?उमेदवारी अर्ज दाखल होण्यास काहीच दिवस बाकी असताना शहरात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. गटबाजी, नाराजी आणि नव्या आघाड्यांच्या चर्चांनी वातावरण रंगवलं आहे.आता चाकणकरांचं लक्ष एका प्रश्नावर केंद्रित झालं आहे.या वेळी नगरपरिषदेत कोणाचा झेंडा फडकणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy