
पोलिस आयुक्त विनय चोबे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन; भक्तिभाव, श्रद्धा आणि प्रकाशाचा संगम
बातमी 24तास
(पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बद्रीनारायण घुगे ) पंढरीच्या वाटेवरील संत तुकाराम महाराजांच्या पावन देहू नगरीत श्रद्धा, भक्ती आणि प्रकाशाचा संगम घडवणारा दीपोत्सवाचा भव्य सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. देहू देवस्थान संस्थानच्या वतीने आयोजित या दीपोत्सवाचा शुभारंभ पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त मा. विनयकुमार चोबे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. या वेळी श्री विठ्ठल-रखुमाई आणि संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले.
“पिंपरी चिंचवडमध्ये सुख-शांती नांदो” — आयुक्त विनय चोबे या प्रसंगी म्हणाले, : आज देहू नगरीत येऊन संत तुकाराम महाराजांचे तसेच विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्याचा आणि या पवित्र ठिकाणी दीपप्रज्वलन करण्याचा योग आला, हे माझं मोठं भाग्य आहे. या ठिकाणचं आध्यात्मिक वातावरण, दीपोत्सवाची रोषणाई आणि भक्तिभाव पाहून मन प्रसन्न झालं. या दीपावली पाडव्यानिमित्त पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना दीर्घायुष्य लाभो, सर्वत्र सुख-शांती नांदो अशी प्रार्थना मी पांडुरंगाच्या चरणी केली.
”‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात उजळली देहू नगरीआळंदीच्या ज्ञानेश्वरी ओव्या आणि देहूच्या अभंगांनी सजलेल्या वातावरणात दीपोत्सवाच्या प्रकाशाने संपूर्ण मंदिर परिसर तेजोमय झाला होता. दीपांनी उजळलेल्या प्रत्येक कणात भक्तिरस सांडत होता. जणू स्वयं विठ्ठलच भक्तांच्या ओंजळीत येऊन विराजमान झाले होते. संपूर्ण नगरीत हरिनामाचा अखंड गजर “ज्ञानोबा-तुकाराम” गुंजत होता. भक्तांच्या ओठांवर नाम, डोळ्यांत आनंदाश्रू आणि अंतःकरणात विठ्ठलाचा अनुभव भरून राहिला होता.अनेक मान्यवरांची उपस्थिती या दीपोत्सव सोहळ्याला देहू देवस्थान संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, विक्रमसिंह महाराज मोरे, दिलीप महाराज मोरे, माजी विश्वस्त, तसेच पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.अशा भक्तिमय आणि दिव्य वातावरणात पार पडलेला हा दीपोत्सव देहू नगरीत भक्ती, श्रद्धा आणि प्रकाशाचा अद्भुत संगम घडवणारा ठरला.