
बातमी 24तास चाकण प्रतिनिधी, (अतिश मेटे): चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण परिसरात चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून अवघ्या २४ तासांत दोन मोठ्या घरफोड्या आणि चार चोरीच्या घटना घडल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खेड तालुक्यातील शेलगाव, भोसे, रासे, वडगाव घेणंद आणि शेलपिंपळगाव परिसरात चोरट्यांनी रात्रीपासून ते दिवसाढवळ्या धाडसी चोरीच्या घटना घडवल्या आहेत. या चोरट्यांनी घरांचे कुलूप तोडून आत प्रवेश करत ३५ ते ४० तोळे सोने-चांदीचे दागिने, लाखो रुपयांची रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या आहेत.
या सलग चोरीच्या घटनांमुळे चाकण पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून तपास पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. मात्र, मागील काही वर्षांपासून या भागात सतत चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.स्थानिक रहिवाशांनी पोलिसांकडे नाईट पेट्रोलिंग वाढवण्याची आणि संशयितांवर लक्ष ठेवण्याची मागणी केली आहे. दर काही दिवसांनी चोरीच्या घटना घडत असून आम्ही असुरक्षित झालो आहोत, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले.नागरिकांचा आग्रह आहे की पोलिसांनी थातुरमातुर कारवाई न करता गंभीर तपास करून या चोरीमागील टोळ्यांचा शोध घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा.