
बातमी 24तास
चाकण प्रतिनिधी, (अतिश मेटे ): आगामी चाकण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज चाकण शहरात महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस पक्षाचे ज्येष्ठ नेते व तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते , जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जि.प. अध्यक्षा निर्मला पानसरे, तालुका महिला अध्यक्षा संध्या जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कमल कड, खेड तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, चाकण शहराध्यक्ष राम गोरे, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष मुबीन काझी, नगरसेवक धीरज मुटके, साहेबराव कड, विशाल नायकवाडी, प्रकाश भुजबळ, गुलाब शेवकरी, योगेश देशमुख, सुयोग शेवकरी, किरण पठारे, बाबा कौटकर, सुदाम भाऊ शेवकरी, विजया तोडकर, निलोफर शेख, अमोल घोगरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत दिलीप मोहिते यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी निवडणुकीत जिवाचे रान केले, त्या सर्वांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. पराभव झाला असला तरी खचून जाणार नाही. नवीन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चाकणचा चेहरामोहरा बदलणार आहे.ते पुढे म्हणाले की, मागील कार्यकाळात चाकण मी तालुक्यात तसेच राजगुरूनगर, चाकण, आळंदी शहरासाठी पाणीपुरवठा योजना, उपजिल्हा रुग्णालय, रस्ते या मूलभूत सोयी उपलब्ध करून दिल्या. पुढील काळात चाकणमधील वाहतूक कोंडी, उपनगरातील रस्ते, नवीन प्रशासकीय इमारत, नागरिकांसाठी प्लेग्राउंड, जेष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क, ओपन जिम आदी सुविधा निर्माण करण्याचा संकल्प आहे.
जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजातील सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन निवडणुका जिंका. गरीब पण निष्ठावान कार्यकर्त्यांना पक्षातून संधी मिळाली पाहिजे. राष्ट्रवादी परिवार मिलन या उपक्रमांतर्गत नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी दररोज आपल्या प्रभागातील नागरिकांच्या भेटी घ्याव्यात, चहापान करून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात व त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधावा.बैठकीचे प्रास्ताविक राम गोरे यांनी केले, तर मुबीन काझी यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले.