
बातमी 24तास चाकण (प्रतिनिधी) – चाकण नगरपरिषदचे माजी विरोधी पक्षनेते जीवन आनंदराव सोनावणे ( वय 57 वर्ष )यांचे आकस्मिक निधन झाल्याने चाकण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सन 2015-16 च्या नगरपरिषद निवडणुकीत ते जनतेच्या प्रचंड विश्वासाने निवडून आले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी शहरातील विविध विकासकामांत सक्रिय सहभाग घेत, सामाजिक आणि लोकहिताच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली होती.
सोनावणे हे खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते यांचे जवळचे सहकारी होते. त्यांनी दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून जनतेशी नाते जपले. नागरिकांच्या समस्या, कामगारांचे हक्क, आणि चाकणच्या उद्योग क्षेत्राशी निगडित विषयांवर त्यांनी अनेकदा पुढाकार घेतला. चाकण MIDC क्षेत्रात उद्योगांना प्रोत्साहन मिळावे, तसेच स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले होते.त्यांच्या अंत्यविधी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. शहरात शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.मागे पत्नी, मुले, भाऊ, बहिणी असा परिवार असून त्यांच्या निधनामुळे सोनावणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.चाकणच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात मोलाचे योगदान देणारे जीवन आनंदराव सोनावणे यांच्या निधनाने चाकण नगरपरिषद आणि संपूर्ण खेड तालुक्याने एक प्रामाणिक, कार्यतत्पर आणि लोकाभिमुख कार्यकर्ता गमावला आहे.

जाहिरात ☝️