
शेती, रेड व ग्रीन झोनमध्ये नागरिकांची फसवणूक : आमदार सुनील शेळके यांची माहिती
बातमी 24तास
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बद्रीनारायण घुगे
देहूगाव (ता.५): देहूगाव परिसरात शेती, रेड आणि ग्रीन झोनमध्ये घरबांधणी करून राहणाऱ्या सुमारे सात ते आठ हजार कुटुंबांना मूलभूत नागरी सुविधा मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. रस्ते, पाणी, गटार व्यवस्था नसल्यामुळे या भागातील नागरिकांचे हाल होत आहेत. संबंधित प्लॉट विक्रेते आणि शेतकऱ्यांनी फसवणूक केली असून, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.
देहूतील सरस्वती लॉन्समध्ये रविवारी (ता.५) आयोजित जनसंवाद अभियानात आमदार शेळके बोलत होते. या संवाद कार्यक्रमात विविध विभागांचे अधिकारी, देहूनगर पंचायतीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई; नागरिकांच्या समस्या ऐकून तत्काळ उपाययोजना :- या भागात अनेक नागरिकांनी शेती झोन, रेड झोन आणि ग्रीन बेल्टमध्ये प्लॉट घेऊन घरे बांधली आहेत. मात्र, त्याठिकाणी ना रस्ते आहेत, ना पाण्याची व्यवस्था, ना गटारांची सोय. प्लॉट विक्रेत्यांनी नागरिकांना मूळ नियोजनाची माहिती न देता फसवले आहे. “प्लॉट विक्रेत्यांनी सुविधा न देता फक्त पैसे घेतले आहेत. अशा विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई होईल. संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत,” असे आमदार शेळके म्हणाले.
१० ते १५ कोटींचा निधी मंजूर; समस्या सोडवण्यासाठी ठोस पावले : – जनसंवाद अभियानादरम्यान आमदार शेळके यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पुढील १० ते १२ दिवसांत देहूनगर पंचायतीकडे १० ते १५ कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात येणार असून, रस्ते, पाणी, गटार, वीज या समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.“जेवढ्या लेखी तक्रारी आल्या आहेत, त्या तातडीने सोडवण्यात येतील. काही अधिकाऱ्यांना घटनास्थळीच सूचना दिल्या आहेत,” असेही आमदारांनी स्पष्ट केले.
डीपी प्लॅन एक वर्षात पूर्ण; पहिला टप्पा लवकरच देहूगावासाठी विकास आराखडा (डीपी प्लॅन) तयार करण्याचे काम सुरू असून, राज्य सरकारने यासाठी एजन्सी नेमली आहे. पहिला टप्पा पुढील महिन्यात जाहीर होईल. सूनावण्या, हरकती घेतल्यानंतर अंतिम आराखड्यासाठी सुमारे एक वर्ष लागणार आहे.नागरिकांना इशारा : शेती, रेड झोनमध्ये प्लॉट घेऊ नक “रेड झोन व शेती झोनमध्ये प्लॉट घेऊन घरे बांधणे टाळा. तिथे कोणतीही कायदेशीर परवानगी मिळणार नाही. सुविधा मिळणार नाहीत. आमदार म्हणून कोणाचे घर पाडण्यासाठी मी निवडून आलेलो नाही. पण कायद्याप्रमाणे कारवाई होईल,” असा स्पष्ट इशारा आमदार शेळके यांनी दिला.
*समस्याग्रस्त वॉर्डांची पाहणी; महिलांच्या तक्रारींची दखल* कार्यक्रमादरम्यान महिलांनी काही वॉर्डांमध्ये सुविधा नसल्याच्या तक्रारी केल्या. त्यावर आमदारांनी त्या भागांची प्रत्यक्ष पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित काम सुरू करण्याचे आदेश दिले.या जनसंवाद कार्यक्रमाला तहसीलदार जयराज देशमुख, देहूनगर पंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, नगराध्यक्षा पूजा दिवटे, उपनगराध्यक्ष प्रियांका मोरे, नगरसेवक योगेश काळोखे, मयूर शिवशरण, पूनम काळोखे, स्मिता चव्हाण यांच्यासह महावितरण, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक व पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.समारोपदेहू परिसरातील झोनिंग आणि नियोजनातील विसंगतीमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी जनसंवादाद्वारे थेट हस्तक्षेप केला आहे. येत्या काळात निधीच्या माध्यमातून सोयीसुविधा उभारण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, नागरिकांनी झोन नियमांचा विचार करूनच गुंतवणूक करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. यावेळी देहू राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष विवेक काळोखे नगरसेवक योगेश काळोखे स्वप्निल आप्पा काळोखे कांतीलाल काळोखे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.