
बातमी 24तास,
(पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बद्रीनारायण घुगे) महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, सोलापूर, धाराशिव, हिंगोली या भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्तांना मदतीचा दिलासा देण्यासाठी देहूगाव व पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाने पुढाकार घेतला आहे.
स्थानिक हनुमान मंदिरात मदत संकलन केंद्र उभारून, नागरिक व व्यापाऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. गहू, तांदूळ, पोहे, तूर डाळ, साखर, चादरी, साबण, तेल, टूथपेस्ट, ब्रश यांसारख्या आवश्यक जीवनावश्यक वस्तू तसेच शालेय साहित्य मोठ्या प्रमाणावर जमा करण्यात आले आहे.सकल मराठा समाज बांधवांनी सर्व संकलित साहित्याचे योग्य प्रकारे किट्स तयार केले असून, आज सायंकाळपर्यंत ही मदत पूरग्रस्त भागात पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
“एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ” या संतवचनानुसार माणुसकीचे दर्शन घडवणारा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. देहू व पंचक्रोशीतील सर्व मराठा समाज बांधवांनी नागरिकांना अधिकाधिक मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
