
नगरपरिषदेच्या फायर ब्रिगेडच्या दक्षतेने रस्ता झाला सुरक्षित
बातमी 24तास
चाकण (प्रतिनिधी अतिश मेटे) : चाकण–आंबेठाण मार्गावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि घाण साचून वाहतूक धोकादायक झाली होती. या मार्गावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी तसेच औद्योगिक मालवाहू वाहनांची ये-जा होत असल्याने अपघातांचा धोका सातत्याने वाढत होता. नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर अखेर नगरपरिषद प्रशासनाने फायर ब्रिगेडच्या वाहनाच्या साहाय्याने रस्त्याची स्वच्छता मोहिम राबवली.
प्रशासनाची तातडीची कारवाई :-नागरिकांच्या या मागणीची दखल घेत नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी तातडीने फायर ब्रिगेडला पाणीफेक वाहनासह घटनास्थळी पाठवले. आग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या पाण्याच्या फवाऱ्याने रस्त्यावरील साचलेला चिखल व घाण धुऊन काढण्याचे काम हाती घेतले. काही तासांच्या मेहनतीनंतर संपूर्ण रस्ता स्वच्छ करण्यात आला आणि चिखलाचा थर पूर्णपणे नाहीसा झाला.वाहतूक सुरळीत, नागरिकांचा दिलासास्वच्छता मोहिमेनंतर आता या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरळीत झाली असून दुचाकीस्वारांना घसरून अपघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. नागरिकांनी या तातडीच्या कारवाईबद्दल नगरपरिषद व फायर ब्रिगेडचे मनापासून कौतुक केले.
स्थानिकांची मागणी :-रस्ता स्वच्छ झाल्याने दिलासा मिळाला असला तरी पावसाळ्यात नियमितपणे स्वच्छता मोहिम राबवावी, नाल्यांची सफाई करून पाण्याचा निचरा सुरळीत करावा, खड्डे भरण्याचे काम वेगाने करावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आली आहे.नगरपरिषदेकडून वेळेवर झालेल्या या कारवाईमुळे मोठ्या अपघाताचे संकट टळले असून नागरिकांनी प्रशासनाला सातत्याने अशी तत्परता दाखविण्याचे आवाहन केले आहे.

