
चाकण येथे संत शिरोमणी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा
बातमी 24तास चाकण
(प्रतिनिधी, अतिश मेटे) :- चाकण शहर व परिसरातील नाभिक विकास संघाच्या वतीने संत शिरोमणी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास समाजबांधवां सोबतच महिला भगिनींचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिषेक करण्यात आला, या वेळी परिसरात हरिनाम व भजन आदि कार्यक्रम आयोजित केले होते. भक्तिमय वातावरणात कीर्तनकार संदीपन महाराज शिंदे यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून संतांच्या कार्याची व विचारांची उजळणी करून उपस्थितांना अध्यात्मिकतेचा अमृतानुभव दिला.
संत सेना महाराजांचे समाजप्रेम, भक्तीभाव व लोकहिताचे विचार आजच्या पिढीसाठी किती उपयुक्त आहेत यावर त्यांनी विशेष भाष्य केले.कार्यक्रमाच्या अखेरीस सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भक्ती, श्रद्धा व एकतेच्या वातावरणात समाजातील बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.या सोहळ्याचे आयोजन करताना नाभिक विकास संघासोबतच समाजातील महिला भगिनींची सक्रिय सहभागिता लक्षणीय ठरली. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अधिक आकर्षक व यशस्वी झाला.