

बातमी 24तास
चाकण(प्रतिनिधी) चाकण-शिक्रापूर रस्त्यावर पावसामुळे मोठाले खड्डे पडले असून होणाऱ्या गैरसोयीमुळे वाहनचालक त्रस्त झाले असून,चाकण शिक्रापूर चौकात जयहिंद हॉस्पिटल समोर एक चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याने भरलेल्या खोल खड्यात अडकले. या प्रकारामुळे रस्त्यावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली.
याबाबत स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाचा तीव्र निषेध केला आहे.या रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या बाजूला असणारा रस्ता चिखलमय झाला असून, रस्त्यावर खड्डे अधिक खोल झाले असून, त्यात साचलेले पाण्याचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांसाठी धोका निर्माण झाला आहे.
काही ठिकाणी रस्त्याची आधीच असमतोल असलेली किनारच संततधार पडणाऱ्या पावसाने वाहून गेली असून, दिशादर्शक किंवा कोणतीही सूचना फलक नसल्याने अनेक वाहनचालक गोंधळून जाऊन किरकोळ अपघात होत आहेत.नागरिकांनी सांगितले की, या घटनेची माहिती प्रशासनाला वारंवार देऊनही रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही. रोजच्या रोज अपघाताचे प्रसंग उद्भभवत असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपरिषद किंवा एमआयडीसी प्रशासन या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी दिली.
अपघातग्रस्त गाडी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने बाहेर काढण्यात आली. यावरून प्रशासनाची उदासीनता स्पष्टपणे जाणवते. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने रस्त्याची व रस्त्याच्या बाजूला मुरूम, डागडुजी करण्याची मागणी केली आहे. “रस्ते ठीक न झाल्यास, वाहतुकीचा प्रश्न वाढून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. संबंधित विभाग व प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत असून चाकण च्या वाहतूक आणि रस्ते समस्या बाबत तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे.