बेशिस्त वाहनचालकांविरोधात शहर वाहतूक पोलिस शाखेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत असून सुमारे 221 अल्पवयीन मुलांच्या पालकांवर कारवाई केली असून यात सुमारे एक कोटी 10 लाख 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.विशेषतः अल्पवयीन, विना परवाना वाहन चालक या स्वारांवर करडी नजर आहे. शहरातील विविध ठिकाणी , चौकात ठिकठिकाणी ई-चलनाद्वारे कारवाई केली जात आहे मात्र दुसरीकडे मात्र तीन चाकी रिक्षा आणि ट्रिपलसीट दुचाकीस्वार बिनबोभाटपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याकडे मात्र वाहतूक पोलिसांकडून डोळेझाक करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहतूक शाखेने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात धडक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे शहरातील वाहतूकव्यवस्था विस्कळित झाली आहे. वाहतूक सिग्नलवर सर्रासपणे सिग्नलचे उल्लंघन केले जाते. वाहतूक परवान्या शिवाय वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपलसीट दुचाकी सुसाट, फटाक्याचे आवाज करणाऱ्या दुचाकी, असे वाहनचालक सातत्याने दिसून येतात.त्याचप्रमाणे कर्णकर्कश हॉर्न वाजवून भरधाव वेगात ड्रायव्हिंग केली जाते. त्यामुळे शहरात सातत्याने किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत. याची दखल घेत पोलिस आयुक्तांच्या आदेशान्वये शहर वाहतूक शाखेतर्फे आयुक्तालय हद्दीमध्ये बेशिस्त वाहनचालकांविरोधात विशेष धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे.शहर पोलिस वाहतूक शाखेच्या चारही विभागांतर्गत बेशिस्तांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. शहराच्या मुख्य रस्त्यांवर रिक्षाचालकांकडून फ्रन्टसीट प्रवासी बसवून बिनधास्तपणे प्रवासी वाहतूक केली जात आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी रिक्षात बसवून अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. मुजोर रिक्षाचालकांमुळे चौकांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे . बस थांब्यांच्या जागेवर रिक्षा उभ्या केल्या जातात. त्यामुळे पीएमपीएल बस उभी रहाण्यासाठी जागा नसते . या बाबींकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. अशी नागरिकांत चर्चा आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यावर रॅश ड्रायव्हिंगचाकण शहरात विविध प्रकारची दुकाने असल्याने सायंकाळच्या वेळी चाकण एसटी स्टँड माणिक चौक ते महात्मा फुले चौक रोड परिसरात गर्दी असते. याचा फायदा घेत तरुणाई त्यांच्या स्पोर्टस् बाईकवरून या रस्त्याने रॅश ड्रायव्हिंग करताना दिसून येतात. त्याचवेळी महात्मा फुले चौक , नगरपरिषद कॉर्नर याठिकाणी पोलिसांकडून बेशिस्तांवर कारवाईची मोहीम राबवीत होते. अशा रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांनाही पोलिसांनी दांडुक्याचा प्रसाद देण्याची अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होते आहे. काही पालक हौसे पोटी आपल्या अल्पवयीन मुलं मुलींना दुचाकी चालविण्यासाठी देतात तसेच काही महिला वर्गाकडे वाहन परवाना नसताना देखील वाहन चालविताना दिसतात त्याबाबत वाहतूक विभागाकडून अशा चालकांचे समुपदेशन करणे गरजेचे असल्याचे काही जेष्ठ नागरिकांनी मत व्यक्त केले आहे. चाकण शहरातील महत्वाच्या भागात वाहन पार्किंग साठी सम विषम तारखेनुसार बाजू निवडली आहे. तसे फलक ही साधारपणे एक वर्षांपूर्वी ठिकठिकाणी लावले आहेत परंतु या नियमाची अंमलबजावणी अदयापही सुरु झालेली नाही .