
स्विफ्ट कारने तोडलं पुलाचं बॅरिगेट; मंदिरात घुसली – तिघेजण गंभीर जखमी
बातमी 24तास
राजगुरूनगर (प्रतिनिधी,प्रभाकर जाधव.) पुणे-नाशिक महामार्गावर आज (दि. ३०) रोजी सकाळी घडलेल्या विचित्र अपघाताने परिसरात खळबळ उडाली. भरधाव वेगातील स्विफ्ट कारने पुलावरील लोखंडी बॅरिगेट तोडत रस्त्यालगत असलेल्या श्री खडकेश्वर मंदिरात थेट घुसकन प्रवेश केला. या भीषण घटनेत कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, कार नाशिकवरून पुण्याकडे येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कारने प्रथम एका दुचाकीला जोरदार धडक दिली आणि नंतर पुलाचे बॅरिगेट तोडत मंदिराच्या कंपाऊंडमध्ये शिरली. या दुर्घटनेत मंदिराच्या भिंती आणि परिसराचे मोठे नुकसान झाले.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. विशेष म्हणजे, अपघाताच्या वेळी मंदिरात कोणतेही भाविक उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली.जखमींमध्ये करण वीरकर आणि यश टोपे (दोघेही राहणार वाकी) अशी दोन नावे समोर आली आहेत. तर दुचाकीस्वाराची अद्याप ओळख पटलेली नसून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या अपघातामुळे महामार्गावरील काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.