एमआयडीसी मध्ये कंपनी व्यवस्थापनाला त्रास दिल्यास” कडक कारवाई करणार: पोलीस आयुक्तांचा इशारा

Share This News

बातमी 24तास(वृत्त सेवा )

चाकण एमआयडीसीतील गुन्हेगार, स्थानिक गुंड, कामगार संघटना किंवा माथाडी कामगार विनाकारण कंपनी व्यवस्थापनास त्रास देत असल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला. चाकण एमआयडीसीत वाहतूक समन्वय तसेच कंपनी व्यवस्थापकांच्या बैठकीत पोलीस आयुक्त चौबे बोलत होते.

चाकण, एमआयडीसीतील कारखाने टिकविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी एमआयडीसी भयमुक्त करण्यास प्राधान्य आहे. स्थानिक गुंड, कामगार संघटना किंवा माथाडी कामगार विनाकारण कंपनी व्यवस्थापनास त्रास देत असल्यास कडक कारवाई करण्यात येईल. कंपनी व्यवस्थापन, उद्योजकांनी सहकार्य करून पुढे यावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे चाकण एमआयडीसीत वाहतूक समन्वय तसेच कंपनी व्यवस्थापकांच्या बैठकीत पोलीस आयुक्त चौबे बोलत होते. यावेळी पोलीस उपायुक्त बापू बांगर, शिवाजी पवार, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता सतीश चौडेकर, पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण, माथाडी बोर्ड सहायक कामगार आयुक्त निखिल वाळके, खेडचे नायब तहसीलदार राम बिजे, पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीएचे) जितेंद्र पगार यावेळी उपस्थित होते.

महाळुंगे एमआयडीसीतील विविध १२० कंपन्यांच्या प्रतिनिधींशीही आयुक्तांनी संवाद साधला.

एमआयडीसीतील सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी स्वतंत्र महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे कार्यान्वित केले आहे. तसेच, डायल ११२ क्रमांकावरून पोलीस मदत उपलब्ध होते. औद्योगिक तक्रारींच्या निवारणासाठी पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकामध्ये औद्योगिक तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. कोणतीही समस्या, तक्रार असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. कंपनीच्या आत व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच कंपन्यांनी कामगारांच्या वाहनांसाठी वाहनतळ उपलब्ध करून द्यावे, असेही ते म्हणाले.

अवजड वाहनांच्या वाहनतळाची समस्या सुटणार

एमआयडीसीतील वाहतूक समस्यांबाबत एक ऑगस्ट रोजी बैठक झाली होती. त्यावेळी सूचविलेल्या उपाययोजनांचा व त्यांच्या पूर्ततेचा आढावा पोलीस आयुक्तांनी घेतला. अवजड वाहनांच्या वाहनतळासाठी नव्याने जागा उपलब्ध करण्याबाबत चर्चा करून नियोजन करण्यात आले आहे. तसेच वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आराखड्याबाबत माहिती देण्यात आली. त्यामुळे एमआयडीसीतील वाहतूक कोंडींची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

एमआयडीसीतील ३९ गुंडांना ‘मोक्का’

भयमुक्त एमआयडीसी करण्यासाठी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत सहा गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोक्का) कायद्यांतर्गत ३९ गुंडांवर कठोर कारवाई केली आहे. झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्या (एमपीडीए) अंतर्गत ७५ गुंडांवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई सुरू केली आहे. त्याचप्रमाणे २६ गुंडांना पुणे जिल्ह्यातून हद्दपार केले आहे, अशी माहिती चौबे यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy