“आजी-आजोबा मतदानाला चला”, “ताई मतदानाला चला!” विधानसभा निवडणूकीत मतदान जनजागृतीसाठी प्रशासनाचे अभियान-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Share This News

बातमी24तास( वृत्त सेवा) आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुक पारदर्शकपणे पार पाडण्याच्या दृष्टीने संबंधित विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक विषयक कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करून चोखपणे जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती कदम, निवडणूक विषयक सर्व समन्वय अधिकारी, संबंधित विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आदी उपस्थित होते. डॉ. दिवसे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत प्रत्येक नियुक्ती केलेल्या अधिकाऱ्याने खूप मेहनत घेवून चांगली कामगिरी बजावली होती. अशाच प्रकारे आगामी विधानसभा निवडणूकीत प्रत्येकाने जबाबदारीने कामे करावीत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुलभतेने पार पाडण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि नियमांचा वारंवार अभ्यास करावा. कोणत्याही कामात निष्काळजीपणा करू नये. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवडणूक विषयक प्रशिक्षण सत्र आयोजित करावेत. जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखड्यातील वेळापत्रकाप्रमाणे कामे करावीत. यशदा येथे ७ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रत्येक मतदान केंद्राची पाहणी करावी. मतदान केंद्र सर्व सोयी सुविधेसह सज्ज आहेत की नाही याची खात्री करावी. मतदानाच्या दिवशी खुप मोठया रांगा लागू नये याची विशेषत: काळजी घ्यावी. सर्व मतदान केंद्रावर वेब कास्टींगची प्रक्रिया पूर्ण करावी. भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी) पथकातील सदस्यांची नियुक्ती करण्याची कार्यवाही करावी. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जास्तीत जास्त मतदार जनजागृती मोहीम राबवावी. नो युवर पोलिंग स्टेशन, आजी आजोबा मतदानाला चला, ताई मतदानाला चला, यासारखे अभियान राबवून मतदान जनजागृती करावी. नवीन मतदान केंद्राबाबत मतदारांना अवगत करावे. ईव्हीएम मशीन जागरूकता कार्यक्रम योग्य रितीने राबवावा. इत्यादी बाबीवर विशेष लक्ष केंद्रित करून स्वीप व्यवस्थापन कक्षाने जनजागृती विषयक विविध उपक्रम राबवावे. आवश्यक मनुष्यबळासाठी विविध कार्यालये, संस्थाकडून मनुष्यबळाचा डेटा घ्यावा. मनुष्यबळ व्यवस्थापनाची कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिल्यात.बैठकीत निवडणूक प्रक्रिया, मतदान प्रक्रिया, मतदान केंद्र, मनुष्यबळ, साधनसाम्रुगी, ईव्हीएम स्ट्रॉंग रुम, वेबकास्टिंग, संपर्क आराखडा, मतदार जनजागृती, माध्यम कक्ष, विविध कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy