विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी युवा पिढी सक्षम होणे गरजेचे- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Share This News

बातमी24तास(वृत्त सेवा)

पुणे: विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी युवा पीढी सक्षम, आत्मनिर्भर, उद्योजक, साक्षर आणि कौशल्यप्राप्त होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग आणि समर्थ युवा फाऊंडेशन स्कूल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे छत्रपती शिवाजीनगर येथील मॉर्डन महाविद्यालय येथे आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी मोहोळ बोलत होते.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, कौशल्य विकास विभागाच्या विभागीय उपायुक्त अनुपमा पवार, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक सहसंचालक रमाकांत भावसार, समर्थ युवा फाऊंडेशन चे अध्यक्ष राजेश पांडे आदी उपस्थित होते.

तरुणांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी समर्थ युवा फाऊंडेशनने पुढाकार घेतल्याबद्दल प्रशंसा करुन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, युवा पीढी सक्षम, आत्मनिर्भर, उद्योजक, साक्षर आणि कौशल्यप्राप्त व्हावी यासाठी केंद्र शासनाने अर्थसंकल्पात सुमारे १ लाख ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. देशातील एक कोटी तरुणांना कार्य प्रशिक्षणासाठी देशातील मोठ्या कंपन्यांना अनुदान देण्यात येणार आहे.देशात राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या (एनएसडीसी) माध्यमातूनही युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार होत आहेत. त्याअंतर्गत पुण्यातही आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र स्थापन होत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे गुणवत्तापूर्ण शिक्षण, आर्थिक विकास, भारतीय ज्ञानपरंपरांवर आधारित शिक्षण, तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर, तसेच स्वयंरोजगार व कौशल्य विकासास प्राधान्य दिले आहे. त्यासाठी युवकांनी शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेऊन स्वत:ची आणि राष्ट्राची प्रगती करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हीडीओ संदेश दाखविण्यात आला. महिलांना कौशल्य आधारित संधी उपलब्ध करुन देणे गरजेचे- चंद्रकांतदादा पाटीलउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, कुटुंबांच्या आर्थिक गरजांसाठी युवकांसोबतच महिलांसाठी कौशल्य आधारित संधी निर्माण करणे गरजेचे आहे. घरातली सर्व जबाबदारी सांभाळत त्यांच्यासाठी कौशल्य आधारित रोजगाराच्या संधी घरीच कशा उपलब्ध होतील हे पाहिले पाहिजे. कौशल्यांमुळे चांगले उत्पन्न मिळून आर्थिक प्रगती होते. संपूर्ण जगात कौशल्याधारीत मनुष्यबळाला मोठी संधी निर्माण झाली असून युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा. पारंपरिक शिक्षण घेतलेल्यांनी कौशल्यांची जोड दिल्यास या संधी मिळणार आहे, असेही ते म्हणाले.शालेय शिक्षण मंत्री केसरकर म्हणाले, भारताच्या तुलनेत परदेशात आर्थिक प्राप्ती जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने जर्मनी देशातील बाडेन वुटेनबर्ग या राज्याशी सामंजस्य करार करुन युवकांसाठी चांगलीं संधी निर्माण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. तरुण सुखी झाला तर कुटुंब सुखी होईल. युवक भारताची शक्ती आहे. पहिल्या टप्प्यात दहा हजार युवकांना प्रशिक्षित करुन जर्मनीला पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जर्मन भाषा शिकणे गरजेचे आहे. यापूर्वी इंग्रजीतून जर्मन भाषा शिकविण्यात येत होती मात्र आता मराठीतून जर्मन भाषा शिकवण्याचा प्रयोग सुरू करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, शिक्षणामुळे रोजगार संधी निर्माण होते. स्वप्न साकार करण्यासाठी युवकांनी सकारात्मक रहावे. परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी येथील युवकांनी विविध देशांतील भाषा शिकायला हव्यात, कौशल्ये प्राप्त केली पाहिजेत. यासाठी स्वयंसेवी संस्था, तसेच खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती यांचा कृती दल तयार करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. युवकांनी परदेशात विविध पदांवर जाण्यासाठी जिद्द आणि चिकाटी ठेवावी, असे त्या म्हणाल्या.जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, आज रोजगार व स्वयंरोजगार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पुणे विद्येचे माहेरघर, आयटी हब आहे. आज रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे मात्र युवकांनी स्वत:ला कौशल्याने सक्षम बनवत या संधींचा लाभ घेणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री युवा दूत योजनेचा युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.राजेश पांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले, स्थानिक मुलांना रोजगार व स्वयंरोजगार मिळावा या उद्देशाने हा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात १३१ कंपन्या, आस्थापनांनी सहभाग नोंदविला असून १८ हजार २५७ रिक्त जागा भरण्यासाठी मागणी कळविली होती. सुमारे ९ हजार ५०० गरजूंनी मेळाव्यात विविध स्टॉल्सला भेट दिली तर ७ हजार २०० जणांनी नोकरीसाठी मुलाखती दिल्या. त्यानुसार मेळाव्यात निवडप्रक्रिया करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy