पुण्याच्या युवकाची तीन देशात आरोग्य संबंधी जनजागृती करत विक्रमी बाईक राईड

Share This News

बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल

(वृत्त सेवा): सध्या दुचाकीवरून भ्रमंती करताना अनेक युवक आपण पाहतो. परंतु अपला छंद जोपासत असताना सामाजिक भान जपणारे खूप कमी लोक असतात. पुण्याच्या गणेश म्हमाणे या दुचाकीस्वाराने नुकतीच भारत नेपाळ आणि भूतान या तीन देशात बाईक भ्रमंती केली, आपला बाईक भ्रमंतीचा छंद जोपासत असताना त्याने या राईड दरम्यान आरोग्य विषयक जनजागृती देखील केली.

एकूण १२ दिवसात तब्बल ६००० किमी एवढे अंतर यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या या बाईक राईड ची नोंद हार्वर्ड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे. पुण्याहून दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी राइडला सुरुवात केली होती, पुढे मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यातून सूनौली बॉर्डर मधून नेपाळ देशात आगमन झाले. गौतम बुद्धांचे जन्मस्थान असलेले लुंबिनी येथे दर्शन घेऊन पुढे काठमांडू गाठले. काठमांडू शहरातील काही महत्त्वाच्या स्थळांना भेट देऊन दार्जिलिंगच्या दिशेने आपला प्रवास सुरू ठेवला. नेपाळमधील छोट्या छोट्या गावात आरोग्य आणि स्वच्छता विषयक जनजागृती केली. नेपाळ पशुपती बॉर्डर येथून भारतातील दार्जिलिंग, सिलिगुरी असा प्रवास करीत भूतान देशात प्रवेश केला. नेपाळ आणि भूतान देशातील संस्कृती अनुभवल्यानंतर पुन्हा भारतात आपल्या शहराकडे मार्गक्रमण केले. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड या राज्यातून प्रवास करून महाराष्ट्रात पुणे येथे दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी या विक्रमी बाईक राईडची सांगता झाली. प्रवासादरम्यान विविध प्रांतातून जात असताना लोकांचे भरभरुन प्रेम मिळाले तसेच अनेक चांगले अनुभव आल्याचे गणेश म्हमाणे यांनी सांगितले.

दरम्यानचा प्रवास अतिशय खडतर होता, अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ऊन पाऊस आणि कडाक्याच्या थंडीत बाईक चालवली. अनेकदा खराब रस्त्यांवरून प्रवास करावा लागला. बाईकमध्ये तांत्रिक बिघाड देखील झाले, परंतु गणेश याने जिद्दीने सर्व अडचणींवर मात करून आपले लक्ष गाठले. गणेशच्या या विक्रमी बाईक राईडचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy