बातमी 24तास
Web News Portal(क्राईम रिपोर्टर )
सध्याच्या सोशल मीडियाच्या मायानगरीत एखाद्याचा व्हिडिओ लाईक करणे त्यानंतर संबधीत साईट, लिंक किंवा गुगलला सकारात्मक रिव्ह्यू देणे यासाठी पैसे देण्याच्या बहाण्याने नागरिकांना जाळ्यात अडकवण्यात येते आणि त्यानंतर त्यांची फसवणूक करण्यात येते. अशा प्रकारात सध्या वाढ होत आहे. टास्क देऊन त्यानंतर फसवणूक केल्याचे प्रकार समोर येत असतानाच आता चक्क चित्रपटाला चांगला रिव्ह्यू दिला तर पैसे देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची 21 लाख 33 हजार रुपयांना फसवणूक करण्यात आलेली आहे. शुक्रवार पेठ परिसरात ही घटना घडलेली आहे.पुण्यामध्ये गुगल रिव्ह्यूज स्कॅम तसेच यूट्यूब लाईक स्कॅम काही दिवसांपूर्वी समोर आलेले असताना हा प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भूषण सुभाष मेटे ( वय 42 राहणार शुक्रवार पेठ ) असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव असून त्यांना एका अनोळखी नंबरवरून व्हाट्सअप मेसेज आला होता. त्यामध्ये एका चित्रपटाला रिव्ह्यू देऊन जर टास्क पूर्ण केले तर तुम्हाला चांगला मोबदला मिळेल असे सांगण्यात आलेले होते. त्यासंदर्भात टेलिग्रामच्या ग्रुपची एक लिंक देखील त्यांना पाठवण्यात आली.आणि डिपॉझिट देखील भरण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला रक्कम जमा केल्यानंतर काही काळ त्यांना काही दिवस त्यांना परतावा देखील देण्यात आला. मात्र त्यानंतर वेगवेगळी कारणे देत त्यांच्याकडून तब्बल 21 लाख 33 हजार रुपये एका अकाउंटला जमा करून घेण्यात आले.काही काळ उलटल्यानंतर जमा केलेल्या पैशाचा मोबदला मिळत नाही हे भूषण मेटे यांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी अनोळखी मोबाईल नंबरवर फोन केला त्यावेळी कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. भूषण यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत संपूर्ण प्रकाराचा जबाब दिलेला असून फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे .