बातमी 24तास
Web News Portal
(क्राईम रिपोर्टर )
जुन्या मोबाईलचे दीड हजार रुपये मागितल्या च्या रागातून एकाने गळ्यावर ब्लेडने वार करून तसेच डोक्यात वार करून खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी राम श्रीकांत वाघमारे (वय 20, रा. वारजे पुलाजवळ, फूटपाथ, वारजे) याला अटक केली आहे. अमरजित जगन्नाथ गोयल (वय 50, रा. वारजे पुलाजवळ, मूळ उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक राहुल कदम यांनी वारजे माळवाडी पोलिसात तक्रार दिली आहे. ही घटना शनिवारी रात्री अकरा वाजता वारजे पुलाजवळील बराटे गार्डनजवळ घडली. याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वारजे पुलाजवळील बराटे गार्डनजवळील फूटपाथवर एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात गळ्यावर ब्लेडने वार केल्याने व डोक्यावर वार केल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता नीलेश खोजे व गणेश तालकुटे यांच्याकडून माहिती मिळाली. अमरजित गोयल आणि राम वाघमारे हे दोघे फूटपाथवर राहत होते. गोयल याने जुना मोबाईल वाघमारेला दिला. मात्र त्याचे राहिलेले दीड हजार रुपये दिले नाहीत. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यादरम्यान वाघमारे याने त्याच्यावर कोयत्याने वार करून गळ्यावर ब्लेडने वार केले. यामध्ये गोयल यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी सहायक पोलिस आयुक्त सुनील पवार, वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. हाके, पोलिस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे,सहायक पोलिस निरीक्षक बाबर, उपनिरीक्षक मनोज बागल, पोलिस उपनिरीक्षक काळे, पोलिस उपनिरीक्षक पारवे आदी घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक बाबर पुढील तपास करत आहेत.