बातमी 24तास
(क्राईम रिपोर्ट) प्रेमासाठी कोण कोणत्या थराला जाईल हे काही सांगता येत नाही, प्रेम कधी जातं पात,वय, नातं पाहत नाही अशाच एका प्रकरातून दोन मुलं असलेल्या महिलेने आपल्या दोन साथीदाराना हाताशी धरून आपल्या प्रियकरचे पुण्यातून अपहरण करून गुजरात येथील वापी मध्ये नेल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की,पुणे शहरातील उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही विचित्र घटना घडली. 28 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या 23 वर्षीय प्रियकराचे अपहरण केल्याचं समोर आलं. प्रियकराचं लग्न ठरल्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.या तरुणाचं अपहरण करुन त्याला गुजरातमध्ये वापी या ठिकाणी नेण्यात आलं होतं. पुणे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून तिथून त्या तरुणाची सुटका केली. आरोपी महिलेसह तिच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
नेमका प्रकारण काय? 22 जून 2023 रोजी उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झालेल्या तरुणाच्या भावाने तक्रार दिली की, त्याच्याशी संपर्क होत नाही. बेपत्ता तरुण गेल्या 15 दिवसांपासून त्याच्या भावाकडे राहायला आला होता.त्याचं अपहरण झालं असावं, अशी शंका त्याने व्यक्त केली. तो ज्या ठिकाणाहून बेपत्ता झाल्याची शंका होती तिथे जाऊन पोलिसांनी तपास केला. तेव्हा त्यांच्या हाती एक सी सी टीव्ही व्हिडीओ फुटेज आलं.“त्यांचा भाऊ त्यांच्याकडे 15 दिवसांपासून राहायला आला होता.
त्याचं अपहरण झाल्याची त्यांना शंका होती, मात्र हे कृत्य कोणी केलं याची त्यांना कल्पना नव्हती. ज्या ठिकाणाहून अपहरण झालं असण्याची शक्यता होती तिथे तपास केला असता एक व्हीडीओ क्लिप आम्हाला मिळाली. त्यामध्ये एक महिला आणि दोन व्यक्ती त्या इसमाला घेऊन जात असल्याचं दिसलं. हा व्हीडीओ भावाला दाखवला असता त्याने त्या महिलेला ओळखलं. तिचं नावही त्याने सांगितलं. ती वापीमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली,” एनडीए रस्त्यावरील कोंढवे-धावडे परिसरातून तरुणाचे अपहरण करुन, त्याला गुजरातमधील वापी येथे नेण्यात आले होते. पुणे पोलिसांची एक टीम लागलीच गुजरातकडे रवाना झाली. तेथून त्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आणि त्या तरुणाची सुटका करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला तिथे एका लाँजवर ठेवण्यात आले होते. ती महिलाही त्याच्यासोबत होती. मिळालेल्या माहितीनुसार हे दोघंही सातारा जिल्ह्यातील एकाच गावातले आहेत. आरोपी महिलेचे लग्न झाल्यावर ती गुजरात मधल्या वापी या ठिकाणी स्थायिक झाली. आरोपी महिलेचे आणि अपहरण झालेल्या तरुणाचे पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आरोपी महिलेला दोन मुलं असल्याची माहिती समोर आली.अपहरण झालेला तरुण काही वर्ष वापी मध्येच कामालाही होता. त्याचं लग्न ठरल्यामुळे तो महाराष्ट्रात परत आला. पण तिला ही गोष्ट सहन झाली नाही.आरोपी महिलेने ओळखीच्या दोन तरुणांची मदत घेत त्याच्या अपहरणाचा कट रचला. पुण्यात येऊन ते तिघं मिळून तरुणाला वापीला घेऊन गेले.“या महिलेचे आणि मुलाचे पाच वर्षांपासून प्रेमप्रकरण होतं. पण त्याचं लग्न ठरल्यामुळे त्याचं लग्न होऊ नये आणि तो आपल्याकडेच राहावा यासाठी त्याचं अपहरण केल्याचं निष्पन्न झालं,” पुढील तपास उत्तमनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहे