तुका म्हणे धावा। आहे पंढरी विसावा ॥ प्रत्येक वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी आतूर आहेत. टाळ, मृदुंगाचा नाद आसमंतात घुमतो, संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झालं आहे. हरिनामाच्या गजरात आणि टाळ-मृदंगाच्या तालावर तल्लीन झालेले वारकरी अशा भक्तिपूर्ण वातावरणात ज्ञानोबांची पालखी एक एक टप्पा पार करत विठुरायाचा भेटीच्या ओढीने पुढे जात आहे. पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे या भागातील नागरिकांचा पाहुणचार स्वीकारत आज संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी पुणे जिल्ह्याची हद्द ओलांडून सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्यापूर्वी माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घातलं जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. त्यानंतर पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्याकडे प्रस्थान करणार आहे. पालखीचा लोणंद मुक्काम अडीच दिवसांचा असणार आहे.तुकाराम महारांजची पालखी बारामतीत संत तुकाराम महाराज यांची पालखी आज बारामती शहरात प्रवेश करणार आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने उंडवडी गवळ्यांची येथील पाहुणचार स्वीकारुन पालखी. उंडवडई पठार, बऱ्हाणपूर फाटा, मोरेवाडी, श्राफ पेट्रोलपंप, इथे विसावा घेतल्यानंतर पालखी आज बारामती येथे विसावणार. आज अजित पवार बारामतीत असल्यामुळे ते पालखीच्या स्वागताला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.संत सोपानकाका पालखी सोहळासंत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्याचं यंदा 119वं वर्ष आहे. या पालखी सोहळ्यात 100 दिंड्या सहभागी झाल्या आहेत. संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण आज होणार आहे. सोपानकाका यांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण बारामतीच्या सोमेश्वर नगर येथे होणार आहे.नोहे एकल्याचा खेळ अवघा मेळविला मेळ!‘तुम्ही आम्ही एकमेळी। गदारोळी आनंदे॥’गाये नाचे उडे आपुलिया छंदेलावुनी मृदुंग, श्रुती टाळ, घोष।सेवू ब्रह्मरस आवडीने॥या वारीतून आजही लोककलेचे धडे गिरवले जातात. इथे ना कोणी लहान ना कोणी मोठा, ना कोणी गरीब ना कोणी श्रीमंत, अगदी परदेशी पाहुणे देखली वारीचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. वारीत चालता चालता जेव्हा वारकरी विसावा घेतात तेव्हा ते अनेक खेळ खेळतात. फुगडी, पिंगा, लपंडाव, विटीदांडू, चेंडूफळी, टिपरी, हुंबरी, पावल्या या मैदानी खेळात कुठलाही भेद न ठेवता आनंद लुटतात. ईश्वर हा खेळीया त्यांचे सवंगडी म्हणजे संत आणि भक्त या खेळीया सोबत खेळात सामील होतात. कारण या खेळात देव आणि भक्त हे द्वैत उरतच नाही…पंढरीची वारी हा विश्वाला कवेत घेणार्या विठुरायाच्या भक्तांचा अनुपम्य सोहळा.