बातमी 24तास Web News Portal
(क्राईम रिपोर्टर ) एखाद्या हिंदी चित्रपटा मध्ये शोभेल अशी, पुण्यात एक अत्यंत धक्कादायक थरारक घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीचा त्याच्याच घरात निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी तब्बल २३० सीसीटीव्ही फुटेज तपासत अवघ्या ५ दिवसात या घटनेचा छडा लावला आहे. मुलीच्या प्रेमाला विरोध आणि आईचा होणारा सततचा जाच याला कंटाळून मुलगी, बायको, आणि मुलीच्या प्रियकराने बापाचा काटा काढला आहे. झोपेत डोक्यात वरवंटा मारून आणि मानेवर चाकूने वार करून या मुलीने बापाचा खून केला. धक्कादायक म्हणजे, गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी पुणे-नगर रोड सणसवाडीत येथील एका पेट्रोल पंपाच्या अलीकडे एका नाल्यात मृतदेह टाकला आणि त्यावर पेट्रोल टाकून तो जाळण्याचा प्रयत्न केला.
हा भयानक कट एका अल्पवयीन मुलगीसह तिचा प्रियकर आणि मृत व्यक्ती च्या पत्नीने वेब सिरिज पाहून रचला होता. सदरची घटना ३० मे रोजी रात्री ११.३० च्या सुमारास घडली होती. या घटनेतील आरोपींना शिक्रापूर आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी पाच दिवसात गजाआड केलं.जॉन्सन कॅजीटन लोबो (वय ४९ गुडविल वृंदावन आनंद पार्क वडगाव शेरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी पत्नी सॅन्ड्रा जॉन्सन लोबो (वय ४३), मुलीचा प्रियकर अॅग्नेल जॉय कसबे (वय २३ रा. साईकृपा सोसायटी वडगावशेरी) या दोघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने ९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर अल्पवयीन मुलीलाही ताब्यात घेतले आहे.
याबाबत पुणे ग्रामिण पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, मृत जॉन्सन यांच्या १७ वर्षीय मुलीचे अॅग्नेल कसबे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. तसेच, जॉन्सन हा पत्नीसोबतही सतत वाद घालायचा. जॉन्सनचा अॅग्नेल आणि मुलीच्या प्रेमसंबंधास विरोध होता. त्यातून त्यांचा अनेकदा वाद होता होता. त्यामुळे तिघांनी मिळून जॉन्सन याचा काटा काढण्याच कट रचला.३० मे रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरात जॉन्सनच्या डोक्यात वरंवटा मारून मानेवर चाकूने वार केले. त्यामध्ये जॉन्सन यांचा मृत्यू झाला. दुसर्या दिवशी (३१ मे) रात्रीपर्यंत त्यांनी मृतदेह तसाच घरात ठेवला. त्यानंतर अंधार झाल्यानंतर जॉन्सन यांचा मृतदेह चारचाकी गाडीत घालून पुणे-नगर रस्त्यावरील सणसवाडी जवळील एका पेट्रोल पंपाच्या अलीकडे नाल्यात टाकून पेट्रोल ओतून पेटवून दिला. घरातून मृतदेह बाहेर काढत असताना तो सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला. पोलिसांनी या प्रकरणी सुमारे २३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं, त्यानंतर एक संशयास्पद वॅगनआर चारचाकी गाडीचा शोध घेतला असता ती गाडी वडगावशेरी येथील असल्याचे समजले. त्यावरून पोलिसांनी अॅग्नेल कसबे याचा पत्ता शोधून काढला. पोलिसांनी अॅग्नेल कसबे याची कसून चौकशी केली त्यानंतर त्याने पोलिसांना जॉन्सन लोबो चा खून केल्याची कबुली दिली.