बातमी24तास
मुंबई वृत्त सेवा : सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव लावण्याचा निर्णय झाल्यानंतर सातबारा उताऱ्यावर आता आईचेही नाव लावण्याचा मोठा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. येत्या एक नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव लावण्याचा निर्णय झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातबारा उताऱ्यावरही आईच्या नावाचा समावेश करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.
एक मे नंतर जन्मलेल्या व्यक्तींसाठी बंधनकारक
एक नोव्हेंबर २०२४ या तारखेपासून संबंधित निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. एक मे २०२४ नंतर जन्म झालेल्या व्यक्तीच्या नावावर जमीन खरेदी करायची असल्यास त्यांच्या आईचे नाव बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे वडिलांचे नाव लावणे बंधनकारक नसेल.
विवाहित महिलांना पती किंवा वडिलांच्या नावाची मुभा
तसेच, यापुढे सातबारा उताऱ्यात कुठलाही फेरफार करायचा असेल, तर त्यामध्येही आईचे नाव लावले जाणार आहे. विवाहित महिलांना पती किंवा आपल्या वडिलांचे नाव लावण्याची मुभा देण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने राज्य सरकारकडे पाठवला आहे.दरम्यान, संबंधित निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाने भूमी अभिलेख विभागाकडे पाठवला होता. यात राहिलेल्या काही त्रुटींचा अभ्यास करुन त्यावर उपायही योजण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी एक नोव्हेंबर २०२४ पासून करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात आल्याची माहिती आहे.मराठीसह २४ भाषांमध्ये सातबारा उतारा उपलब्धदरम्यान, जमिनीबाबत इत्यंभूत माहिती देणारा सातबारा मराठी भाषेसह अन्य २४ भाषांमध्ये उपलब्ध करण्याचा निर्णय गेल्या वर्षी मोदी सरकारने घेतला होता. देशातील अशा स्वरूपाचा पहिलाच प्रयोग महाराष्ट्रात राबवण्यात आला होता.