बातमी 24तास
(चाकण, प्रतिनिधी) महावितरणच्या भरारी पथक पुणे यांच्यावतीने भाम, (ता. खेड) येथील पुणे-नाशिक महामार्गावरील हॉटेल न्यू महादेवचे मालक रवींद्र भागाजी मलघे यांच्या विरुद्ध सुमारे १७ लाख ९० हजार २८१ इतक्या रकमेची वीज चोरी केल्याप्रकरणी भाविका २००३ कलम १३५ अंतर्गत चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे अशी माहिती महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विक्रांत सपाटे यांनी दिली.
प्राप्त माहितीनुसार, वीज ग्राहक रवींद्र भागाजी मलघे यांची हॉटेलमधील वीज चोरी उघडकीस आणण्यात आली. मलघे यांच्या हॉटेलमधील वीज मीटर संच व परिसराची महावितरणच्या भरारी पथक पुणे यांनी तपासणी केली असता अनधिकृतपणे इनकमिंग न्यूट्रल वेगळी करून अधिकची न्यूट्रल घेऊन ती एमसीबी स्विचला जोडून घेऊन वीज मीटर पाहिजे तेव्हा वीज मीटर चालू बंद करून मीटरमध्ये वीज वापराची नोंद होणार नाही, अशी व्यवस्था केल्याचे आढळून आले.महावितरणने मलघे या व्यावसायिक ग्राहकास १४ महिन्यांत ५६ हजार ३१८ युनिटचे सुमारे १७ लाख ९० हजार २८१ रुपये इतक्या रकमेचे वीजचोरीचे बिल दिले आहे.दरम्यान रवींद्र मलघे या ग्राहकावर यापूर्वी सप्टेंबर २०२१ मध्ये वीज चोरीची कारवाई झाली होती. या ग्राहकाची दुसऱ्यांदा वीज चोरी उघडकीस आल्यामुळे या वीज ग्राहका विरुद्ध चाकण पोलिस ठाण्यात महावितरणच्या वतीने भाविका २००३ कलम १३५ अंतर्गत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. ही कारवाई महावितरणचे पुणे परिक्षेत्र उपसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता विक्रांत सपाटे, कनिष्ठ अभियंता कैलास काळे, वरिष्ठ तंत्रज्ञ सचिन जाधव, तंत्रज्ञ गणेश कराड यांच्या पथकाने केली.