बातमी24तास पिंपरी । प्रतिनिधी
स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील समाविष्ट गाव डुडूळगावमध्ये पर्यटन व स्थानिक नागरिकांना सुविधा अशा संकल्पनेतून दुर्गा टेकडी, निगडीच्या धर्तीवर ‘‘इको टुरिझम पार्क’’ विकसित करणे आणि वन विभागाच्या हद्दीत असलेल्या रस्त्यांची कामे मार्गी लावण्याबाबत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेणार आहेत. डुडूळगाव येथील वन विभागाच्या हद्दीत ‘इको टुरिझम पार्क’ व प्रस्तावित रस्त्यांच्या कामांना चालना देण्यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत पावसाळी अधिवशेनाच्या निमित्ताने वनमंत्री मुनगंटीवार यांना निवेदन दिले होते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घ्यावी, असे निर्देश दिले आहेत.आमदार महेश लांडगे म्हणाले की, मौजे डुडूळगाव येथील वन विभागाचे गट नंबर ७८ व गट नं. १९० अशा एकूण ६६.८५ हे. आर. राखीव वनक्षेत्र आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात सदर क्षेत्र असून, वर्किंग प्लॅन नुसार अर्बन फॉरेस्ट आहे. प्रस्तावित इको टुरिझम पार्क परिसरात सुमारे १ लाखाहून अधिक सदनिका असलेला रेसिडेन्सिअल कॉरिडॉर सदर परिसरात तयार झाला आहे. नागरीकांना कामाच्या ताणापासून मुक्त व्हायचे असेल तर इको पार्कमध्ये एंटरटेन्टमेंट झोन असेल. तसेच, लॉन,ॲम्पीथीएटर, पाम कार्ट, लाइट ॲन्ड साउंड शो, फूड कोर्ट, थिमवर आधारित खेळ, लहान मुलांना खास खेळण्याची सुविधा, पूल असा परिसर विकसित करता येणार आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.