मुंबई/पुणे दि. 8 : भारतीय हवामान विभागाकडून दि. 08 जुलै 2024 रोजी प्राप्त झालेल्या सूचनेनुसार सातारा व पुणे या जिल्ह्यांना दि. 09 जुलै रोजी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला असून जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, सातारा या जिल्ह्यांना आज रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.पुणे जिल्हा प्रशासनाला याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून जिल्ह्यातील नागरिकांना मोबाईलवर सचेत ॲपद्वारे सतर्क राहण्याचा संदेश दिला आहे. नदीकाठी/ दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांनी आवश्यकता असल्यासच बाहेर पडावे. नदीनाल्याच्या पूलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पर्यटनस्थळी धबधबे, धरण परिसर, घाटमाथा इ. ठिकाणी जाण्याचे टाळावे. वीज चमकत असताना झाडाखाली आश्रय घेऊ नये. तसेच अतिवृष्टी दरम्यान जुन्या मोडकळीस आलेल्या घरात/इमारतीत आश्रय घेऊ नये. आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. तसेच मदतीसाठी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाचा संपर्क क्र. 1077 हा असून यावर संपर्क साधावा. असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.दरम्यान जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्गमीत केले आहेत.अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी राहील. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.