(कल्पेश अ. भोई ) चाकण : पुणे नाशिक महामार्गावर आळंदी फाटा स्पायसर चौक ते चाकण येथील श्री संत सावतामाळी चौक (आंबेठाण चौक) तसेच तळेगाव -शिक्रापूर रस्ता येथील परिसरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे नागरिकांना दैनंदिनी वाहतूक समस्येला सामोरे जावे लागत आहे.चाकण, खराबवाडी, म्हाळुंगे या ठिकाणी वाहतुकीचे तीन तेरा वाजत आहे.बेशिस्त वाहन चालक पुढील वाहनाला मागे टाकण्याच्या प्रयत्नात वाहतूकीचा खोळंबा करत वाहतुकीची अडचणीत आणखी भर टाकत आहे.
पुणे- नाशिक महामार्गावर तसेच चाकण -तळेगाव, चाकण- शिक्रापूर मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. चाकणला वाहतूक कोंडीचा शाप लागला आहे. वाहनांच्या अगदी एक, दोन किलोमीटर रांगा लागत आहे. त्यामुळे नागरिक,प्रवाशी,कामगार, विद्यार्थी सारेच संतप्त झाले आहेत. सलग असणाऱ्या सुट्ट्यांमुळे शनिवारी सकाळ पासूनच पुणे नाशिक महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या सुमारे एक ते तीन किलोमीटर रांगा लागल्या होत्या, कोंडीत सापडलेली वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलीस कर्मचारी व त्यांना सहाय्य करणारे ट्राफिक वार्डन यांची तारांबळ उडाली होती. पुणे नाशिक महामार्गावर स्पाईन रोड सिग्नल पासून, मोशी चौक,भारत माता चौक चिंबळी मोई फाटा, कुरळी फाटा स्पायसर चौक, या चौकात सिग्नलला वाहतुकीच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात, या वाहतूक समस्येवर कोणीही बोलण्यास किंवा कोणीही गांभीर्याने विचार करताना दिसत नाही सामान्य नागरिकांनी तर प्रशासनासमोर हातच टेकले असून या वाहतूक समस्येतून बाहेर कोण काढणार असा यक्षप्रश्न किती तरी वर्षापासून सामान्य नागरिकांना भेडसावत आहे.चाकण येथील औद्योगिक वसाहत मोठी आहे. त्यामुळे कामगार तसेच पुणे, मुंबईला कामानिमित्त ये -जा करणारे नागरिक यांची मोठी वर्दळ असते.वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलीस प्रयत्न करतात पण ते प्रयत्न तोकडे पडतात .परंतु वाहनांची वाढलेली संख्या, अरुंद मार्ग त्यातच रस्त्यावर वाढणारे अतिक्रमण त्यामुळे पोलीस हतबल आहेत. प्रशासनाने याच्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.अशी मागणी अतिश मांजरे पाटील समन्वयक मराठा क्रांती मोर्चा व सामाजिक कार्यकर्ते अमोल जगनाडे यांनी केली आहे.