(वृत्त सेवा )विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल राक्षेवाडी व चाकण या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच मोठया उत्साहात भोसरी येथील अंकुश राव लांडगे या नाट्यगृहात संपन्न झाला .
या वेळी वैज्ञानिक सहाय्यक प्रताप भानसिंग(गिरवली) घोडेगाव , अमोल जंगले (गटशिक्षणाधिकारी, खेड ) तसेच संस्थेचे संस्थापक साहेबराव देशमुख (संस्थापक श्री एस पी देशमुख शिक्षण संस्था), कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष शामराव देशमुख, उपाध्यक्ष अक्षयराज देशमुख, संस्थेच्या सेक्रेटरी सौ. रोहिणी ताई देशमुख , खजिनदार सौ. सुमनताई देशमुख , डायरेक्टर सौ.हर्षलताई देशमुख, डी .पी.सोनवणे, राजेंद्र सरनोबत, सौ. अनुराधा सरनोबत व सौ. विजया ताई पाटील या मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल आयोजित ‘डायवर्स डिलाईट’ या संकल्पनेवर आधारित इयत्ता ४थी व ५वी तील विद्यार्थ्यांच्या समूहगीताने व स्वागतगीताने करण्यात आली. तसेच इ.९वी तील विद्यार्थिनींनी स्वागतपर ‘नमामि नमामि’ या गाण्यावर शास्त्रीय नृत्य सादर केले. शाळेतील बालकलाकारांनी सदाबहार नृत्य सादर करून पालकांचे व उपस्थित मान्यवरांचे विशेष लक्ष वेधून घेतले. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व शाळेतील विद्यार्थी ,मुख्याध्यापक ,शिक्षक व इतर कर्मचारी यांच्या मेहनतीचे कौतुकही केले . हे स्नेहसंमेलन केवळ नाट्य, नृत्य यांचा अविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले, हे संमेलन अंतर्मुख करणारे होते. तसेच या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण संगीत व नृत्य होते. कार्यक्रमात यावर्षी उत्तरेकडील राज्यांना अधोरेखित करुन जम्मू काश्मीर,राजस्थान,हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, उत्तरप्रदेश इ राज्यांचे नृत्य प्रकार व तेथील वैशिष्ट्ये, लोकजीवन विद्यार्थ्यांनी त्यांच्या नृत्याच्या अविष्कारातून दाखवण्याचा प्रयत्न केला. पारंपारिक नृत्यांबरोबरच, आधुनिकतेची झालर असलेले गायन ,वादन प्रस्तुत केले गेले. वार्षिक अहवाल वाचनात मुख्याध्यापकांनी शाळेची शैक्षणिक प्रगती तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले विशेष प्राविण्य व भविष्यातील योजना याविषयी माहिती दिली.प्रमुख पाहुण्यांनी शाळेची प्रगती आणि कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन याबद्दल प्रशंसा केली व शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयातील शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला प्रेक्षकांमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेली राम, लक्ष्मण ,सीता यांची मिरवणूक लक्षवेधी ठरली.बालकलाकारांनी प्रस्तुत केलेले रामायण या नाटिकेतूनअयोध्या दर्शन घडवले व त्याचबरोबर गंगामाई ची आरती ही वेगळी संकल्पना दाखवण्यात आली.तसेच शाळेच्या इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांनी महाराणा प्रताप यांची कामगिरी आपल्या नाट्यातून सादर केली.कार्यक्रमाच्या शेवटी कुंभमेळ्यातील अघोरीं नृत्याने प्रेक्षकांच्या अंगावर काटा आला.अशाप्रकारे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमास संस्थेच्या तीनही शाळेचे प्राचार्य यामध्ये नीलम सिंह, रैना मून, स्वाती रणदिवे व दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुखांच्या मार्फत या सुंदर कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली होती. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा शालेय विद्यार्थ्यांनी सांभाळली व संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ. संध्या वाळूंज व माधुरी घोडेकर यांनी केले.